बेळगाव लाईव्ह:शाळेतील एसएसएलसी अर्थात इयत्ता दहावीच्या मुलींना लैंगिक त्रास देत असल्याचा आरोप असलेल्या एका शिक्षकाला संतप्त पालकांनी शाळेत जाऊन चोप दिल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी पोलीस ठाण्याच्या व्याप्तीत आज मंगळवारी घडली.
उर्दू सरकारी माध्यमिक शाळेत कन्नड विषय शिकवणाऱ्या श्रीशैल कुंबार या शिक्षकावर गंभीर आरोप करण्यात आला आहे. कन्नड विषयामध्ये उत्तीर्ण करण्याचे आमिष दाखवून सदर शिक्षक विद्यार्थिनींना शाळेच्या एका खोलीत आणि शौचालयात घेऊन जाऊन त्यांच्याशी लैंगिक चाळे करत होता असे कळते.
या पद्धतीने तो अनेक विद्यार्थिनींना लैंगिक त्रास देत असल्याची कुणकुण लागताच संतप्त झालेल्या पालकांनी आज मंगळवारी शाळेत दाखल होऊन त्या शिक्षकाला जाब विचारण्याबरोबरच त्याला शाळेबाहेर काढून चांगलाच चोप दिला.
त्यामुळे शाळेच्या आवारात काही काळ एकच गोंधळ उडून वातावरण तापले होते. याबाबतची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या चिक्कोडी पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणाखाली आणली. तसेच शिक्षक श्रीशैल कुंबार याला ताब्यात घेतले असून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.




