belgaum

इथे वीज नसल्याने ज्येष्ठ नागरिक बेजार!

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव मधील तहसीलदार कार्यालयातील अनागोंदी कारभार आणि मूलभूत सुविधांच्या अभावामुळे आज वृद्ध, विधवा आणि दिव्यांग नागरिकांना प्रचंड मनस्तापाचा सामना करावा लागला. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून हक्काची पेन्शन जमा न झाल्याने आधीच आर्थिक अडचणीत सापडलेले शेकडो लाभार्थी आज चौकशीसाठी आले असता, कार्यालयात वीज नसल्याचे सांगून त्यांना परत पाठवण्यात आले. शासकीय अधिकाऱ्यांच्या या ढिसाळ नियोजनामुळे संतप्त नागरिकांनी कार्यालयाबाहेरच प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.

विधवा आणि वयोवृद्ध पेन्शन बंद झाल्याने ती पुन्हा सुरू करण्यासाठी, तसेच रखडलेल्या पेन्शनची चौकशी करण्यासाठी आज पहाटेपासूनच शेकडो वृद्ध नागरिक कार्यालयाबाहेर रांगेत उभे होते. मात्र, सकाळी १० वाजल्यापासूनच कार्यालयातील वीज पुरवठा खंडित झाला होता. कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी “करंट नसल्याने काम होणार नाही” असे सांगून हात वर केले. अनेक महिन्यांपासून पेन्शन मिळालेली नाही आणि आज दिवसभर थांबूनही काम न करताच परत जावे लागत असल्याने लाभार्थ्यांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला.

दुसरीकडे, दिव्यांग लाभार्थ्यांची पेन्शनही गेल्या अनेक महिन्यांपासून रखडली आहे. त्यातच भर म्हणून अधिकारी त्यांना वारंवार नवीन वैद्यकीय अहवाल सादर करण्यास सांगून मानसिक त्रास देत असल्याचा आरोप दिव्यांग बांधवांनी केला आहे. रोजचे काम सोडून कार्यालयाचे फेरे मारावे लागत असल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. विशेष म्हणजे, एवढ्या मोठ्या शासकीय कार्यालयात दूरवरून येणाऱ्या नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची साधी सोय नाही आणि स्वच्छतागृहांचीही व्यवस्था नसल्याने वयोवृद्ध आणि महिलांचे अतोनात हाल झाले.

 belgaum

या गंभीर समस्येबाबत बेळगावचे तहसीलदार हनुमंत शिरहट्टी यांना जाब विचारला असता त्यांनी सांगितले की, कार्यालयातील वीज पुरवठा खंडित झाल्याप्रकरणी ‘हेस्कॉम’ विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तातडीने चर्चा करण्यात आली आहे.

पुढील अर्ध्या तासात विजेची समस्या पूर्णपणे सोडवली जाईल, अशी ग्वाही त्यांनी नागरिकांना दिली. मात्र, या संपूर्ण प्रकाराकडे जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांनी केवळ विजेपुरते मर्यादित न पाहता कार्यालयातील मूलभूत सुविधांकडेही तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.