बेळगाव लाईव्ह : बसवेश्वर रेल्वे उड्डाणपुलाजवळील डेक्कन हॉस्पिटलसमोरील न्यू गुड्सशेड रोडची गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. या गंभीर समस्येबाबत सामाजिक कार्यकर्ते गणेश दड्डीकर यांनी १० जून २०२६ रोजी बेळगाव महानगरपालिका आयुक्तांना लेखी निवेदन दिले होते. या निवेदनाची तातडीने दखल घेत, आयुक्त महोदयांच्या आदेशानुसार सोमवार, १५ जून रोजी मनपा विभाग अधिकारी शिल्पा जयराम यांनी सदर ठिकाणी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली.
या प्रत्यक्ष पाहणीदरम्यान न्यू गुड्सशेड रोडची झालेली दुरवस्था आणि मोठमोठे खड्डे मनपा अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. या रोडवरून प्रवास करताना नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याचे प्रत्यक्ष पाहिल्यावर, अधिकाऱ्यांनी या रोडची त्वरित दुरुस्ती करण्यात येईल, असे आश्वासन उपस्थित स्थानिक रहिवाशांना दिले.
महानगरपालिका प्रशासनाने आता केवळ कागदी किंवा तोंडी आश्वासन न देता, या गंभीर प्रश्नाकडे एक महत्त्वाची सार्वजनिक समस्या म्हणून पाहावे, अशी मागणी नागरिकांनी लावून धरली. आगामी पावसाळा तोंडावर असल्याने, पाऊस सुरू होण्यापूर्वीच या रोडच्या कायमस्वरूपी दुरुस्तीचे काम हाती घेऊन ते लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी आग्रही विनंती उपस्थित रहिवाशांनी केली आहे.
डेक्कन हॉस्पिटलसमोरील या मुख्य रोडचा वापर दररोज हजारो नागरिक, रुग्णवाहिका, शालेय बस आणि इतर वाहनचालक करत असतात. रोड पूर्णपणे उखडल्यामुळे रुग्णांना घेऊन जाणाऱ्या वाहनांना आणि शालेय विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर, आता मनपा प्रशासनाने तातडीने प्रत्यक्ष कामाला सुरुवात करून येथील नागरिकांना आणि वाहनचालकांना तात्काळ दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.




