बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागची बैठक सोमवारी संघटनेचे अध्यक्ष शुभम शेळके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने २२ जून रोजी आयोजित करण्यात आलेल्या कन्नडसक्ती विरोधी महामोर्चाला जाहीर पाठिंबा देण्यात आला.
बैठकीत कार्याध्यक्ष धनंजय पाटील यांनी प्रस्तावित उद्दिष्टे मांडताना मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने महामोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन केले. तसेच, वेळोवेळी शुभम शेळके यांना बेळगाव पोलिस प्रशासनाकडून बजावण्यात आलेल्या नोटिसांचा निषेध व्यक्त करत मराठी भाषिकांनी एकजूट दाखवून लढणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहावे, असे ते म्हणाले.
सरचिटणीस मनोहर हुंदरे यांनी कर्नाटक सरकारवर टीका करताना, राज्य सरकारने स्वतःच्या कायद्यांचे उल्लंघन करून कन्नडसक्ती लागू केली असल्याचा आरोप केला. सीमाभागात १५ टक्क्यांहून अधिक मराठी भाषिक वास्तव्यास असूनही मराठी भाषेला योग्य स्थान दिले जात नसल्याचे त्यांनी सांगितले. या विरोधात महामोर्चाच्या माध्यमातून कर्नाटक सरकारला जाब विचारला जावा, असेही त्यांनी नमूद केले.
अध्यक्षीय भाषणात शुभम शेळके यांनी काही मराठी व्यापारी प्रशासनाच्या दबावामुळे आपल्या आस्थापनांवर मराठीला स्थान देत नसल्याची खंत व्यक्त केली. त्याउलट काही कन्नड व्यापारी आपल्या भाषेबरोबरच मराठी भाषेलाही स्थान देत असल्याचे त्यांनी सांगितले. मराठी असो वा कन्नड, मराठी भाषेला स्थान देणाऱ्या दुकानांतूनच व्यवहार करण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले. तसेच २२ जूनचा महामोर्चा यशस्वी करून मराठी समाजाची एकजूट आणि ताकद कर्नाटक प्रशासनाला दाखवून देण्याचे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी शिवाजी हवळाणे आणि रणजित हवळाणे यांनीही मनोगत व्यक्त केले. बैठकीस नगरसेवक शिवाजी मंडोळकर, अशोक घगवे, सुरज जाधव, अभिजित मजुकर, निलेश काकतकर, रोहित जाधव, मोहन धाकलुचे, रोशन पाटील, प्रणय पाटील, परशराम निलजकर, प्रशांत बैलूरकर, प्रभाकर पाटील, श्रीराम पाटील, यश राव, गणेश घवारी, वेदांत पवार, विनायक, प्रतिक पट्टण, प्रविण मजुकर, अमर पाटील, सुरज अनगोळकर, अभिषेक कारेकर, दिपक कालकुंद्री, प्रणित जाधव, अक्षय पाटील, नागेश सरप, रोहन खांडेकर, शुभम देसुरकर आदी उपस्थित होते.




