belgaum

संकेश्वर पोलिसांनी उकलले अज्ञात महिलेच्या हत्येचे गूढ

0
Police logo
 belgaum

बेळगाव लाईव्ह : संकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्गालगत सापडलेल्या एका ५९ वर्षीय अज्ञात महिलेच्या हत्येचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी कोल्हापुरातील एका संशयित आरोपीला अटक करण्यात आली असून, पैशांच्या वादातून हा खून केल्याची कबुली त्याने दिली आहे.

संकेश्वर जवळील सोलापूर गावच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्गाच्या सेवा रस्त्यालगत २६ मे २०२६ रोजी एका अज्ञात महिलेचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला होता. तानाजी यल्लाप्पा शटवकर यांच्या माहितीवरून पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. दरम्यान, इन्स्टाग्रामवर मृतदेहाचा व्हिडिओ पाहून मृत महिलेची मुलगी शबाना मुल्ला हिने संकेश्वर पोलिसांशी संपर्क साधला. मृत महिला तिची आई बेबी बादशहा शेख (वय ५९, रा. उचगाव, सध्या रा. टेंबलाईवाडी, कोल्हापूर) असल्याचे तिने ओळखले.

मृत बेबी शेख आणि कोल्हापुरातील हाजीमस्तान मैनुद्दीन भगवान (वय ४२, रा. विक्रम नगर, कोल्हापूर) यांच्यात आर्थिक व्यवहार होते. हाजीमस्तानने बेबी शेख यांच्याकडून दीड लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यांनी पैशांसाठी तगादा लावल्याने त्याने हत्येचा कट रचला. २५ मे रोजी त्याने बेबी शेख यांना कारमधून नेऊन पाण्याच्या बाटलीतून विष पाजून त्यांची हत्या केली आणि मृतदेह महामार्गावर फेकून दिला.

 belgaum

याप्रकरणी संकेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासाची चक्रे फिरवली. पोलीस निरीक्षक जी. बी. कोंगनोळी आणि उपनिरीक्षक विठ्ठल नाईक यांच्या पथकाने कोल्हापुरातून संशयित हाजीमस्तान भगवान याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली कार जप्त केली आहे. या यशस्वी कामगिरीबद्दल बेळगावचे पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी संपूर्ण तपास पथकाचे कौतुक केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.