belgaum

“१२०+ जागा मिळाल्यावरच CM पदाची चर्चा”– सतीश जारकीहोळी

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह: आगामी २०२८ मधील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला १२० हून अधिक जागांवर विजय मिळवून देणे हेच आपले मुख्य उद्दिष्ट असून, पक्षाला पुन्हा सत्तेत आणल्यानंतरच पुढील मुख्यमंत्रीपदाची गणिते ठरतील, असे स्पष्ट मत राज्याचे मंत्री सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केले आहे.

बेळगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या एका महत्त्वपूर्ण पत्रकार परिषदेत ते बोलत होते. केपीसीसी अध्यक्षपदाच्या शर्यतीत नाव असूनही ते पद न मिळाल्याने पक्षात कोणतीही नाराजी नसल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. पक्षात ‘एक व्यक्ती, एक पद’ या नियमाचे पालन केले जात असल्यामुळेच हा निर्णय झाला असून, यात कोणाचाही अडथळा नव्हता असे सांगत त्यांनी नाराजीच्या चर्चांना पूर्णविराम दिला. तसेच, स्वतःविरुद्ध सोशल मीडिया किंवा इतर माध्यमांतून सुरू असलेल्या अपप्रचाराची पोलीस चौकशी सुरू असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.


अहिंदा नेत्यांना जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात असल्याच्या राजकीय चर्चेवर बोलताना जारकीहोळी यांनी, नेत्यांनी या सर्व गोष्टींच्या पलीकडे जाऊन आपले काम केले पाहिजे, असा सल्ला दिला. सध्यातरी आपल्याला मंत्री म्हणून काम करण्याची पूर्ण संधी मिळाली असल्याचे सांगत त्यांनी समाधान व्यक्त केले.

 belgaum

उपमुख्यमंत्रीपदाच्या संदर्भाने बोलताना त्यांनी ज्येष्ठ नेते जी. परमेश्वर यांचे उदाहरण दिले. २०१६ मध्ये मुख्यमंत्री पदाचे दावेदार असलेल्या जी. परमेश्वर यांनी संयम ठेवल्याने त्यांना आता उपमुख्यमंत्रीपद मिळाले आहे, त्याचप्रमाणे आपणही योग्य वेळेची वाट पाहिल्यास नक्कीच मोठी संधी मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, अहिंदा ही एक वेगळी संघटना असून, राजकीय फायद्यासाठी ही संघटना आगामी काळात अधिक बळकट करणार असल्याचे सूतोवाचही त्यांनी केले.


मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे नेतृत्व बदलल्यास काँग्रेसला आगामी काळात ४० जागाही मिळणार नाहीत, या भाजप नेत्यांच्या आणि आमदार लखन जारकीहोळी यांच्या विधानांचा सतीश जारकीहोळी यांनी खरपूस समाचार घेतला. संबंधित नेत्यांनी नक्की कोणाच्या रागातून किंवा कोणत्या भावनेतून असे विधान केले आहे, हे त्यांनाच विचारले पाहिजे, असा टोला त्यांनी लगावला.

राजकीय घडामोडींसोबतच त्यांनी बेळगावमधील स्थानिक विकासकामांचा आढावा जाहीर केला. शहरातील बहुप्रतीक्षित उड्डाणपुलाच्या उभारणीसाठी या महिन्याअखेरपर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण केली जाईल आणि पावसाळा संपताच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, अशी महत्त्वाची माहिती त्यांनी दिली. याशिवाय, सध्या न्यायालयात प्रलंबित असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (एपीएमसी) खाजगी भाजी मार्केटचा वाद सामोपचाराने मिटवण्याची पूर्ण जिम्मेदारी जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आली असल्याचे सांगत त्यांनी स्थानिक प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.