belgaum

बेळगावातून बेपत्ता व्यक्तीचा मृतदेह खानापूर नदीत

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह :खानापूर तालुक्यातील मलप्रभा नदी घाट परिसरात दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. कुंदन वसंत कलघटकर (वय ४८, रा. येरमाळा रोड, वडगाव) असे मृत व्यक्तीचे नाव असून, मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी खानापूर पोलीस पुढील तपास करत आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, कुंदन कलघटकर हे रविवारी दुपारनंतर घराबाहेर पडले होते. त्यानंतर त्यांच्याशी संपर्क होऊ न शकल्याने कुटुंबीयांनी शोध सुरू केला. ते खानापूरच्या दिशेने गेल्याची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईक व मित्रमंडळींनी विविध ठिकाणी चौकशी केली.
शोधादरम्यान मलप्रभा नदी घाटाजवळ त्यांची दुचाकी आढळून आली.

परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्येही त्यांची हालचाल दिसून आल्याने नदी परिसरात शोधमोहीम तीव्र करण्यात आली. यावेळी नदीतील एका डोहाजवळ चप्पल आढळल्याने शोधकार्य अधिक वेगाने सुरू करण्यात आले.

 belgaum


एनडीआरएफच्या प्राथमिक शोधमोहीमेनंतर एचआरएफसी (HRFC) पथकाला पाचारण करण्यात आले. पथक प्रमुख बसवराज हिरेमठ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अत्याधुनिक पाण्याखालील कॅमेऱ्यांच्या सहाय्याने शोधकार्य राबविले. अखेर डोहाच्या खोल भागात कुंदन कलघटकर यांचा मृतदेह आढळून आला.


या मोहिमेत उमेश अंधारे (यडोगा) आणि रुपेश मुतगेकर (लोकोळी) यांनीही मोलाचे सहकार्य केले. घटनास्थळी खानापूर गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक श्रीमती सपाटे यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविला असून, अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. तपास सुरू आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.