belgaum

बेळगावात मतदार मॅपिंगचे ९३ टक्के काम पूर्ण

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह: मतदार याद्यांची विशेष पुनर्रचना आणि मॅपिंग प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या अध्यक्षतेखाली बेळगावमधील सुवर्ण विधानसौध येथे प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी आणि राजकीय पक्षांची एक महत्त्वाची संयुक्त बैठक नुकतीच संपन्न झाली.

या बैठकीत बोलताना जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, जिल्ह्यातील १८ मतदारसंघांमध्ये २००२ च्या मतदार यादीच्या आधारे २०२५ च्या यादीची तपासणी सुरू असून, आतापर्यंत जिल्ह्यातील मतदार मॅपिंगचे ९३ टक्के काम यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे.

लोकशाहीच्या या महत्त्वाच्या प्रक्रियेत योग्य कागदपत्रांसह असणारा कोणताही रहिवासी मतदानापासून वंचित राहणार नाही, ही प्रशासन आणि राजकीय पक्षांची संयुक्त जबाबदारी असल्याचे त्यांनी यावेळी ठामपणे सांगितले.

 belgaum


या प्रक्रियेदरम्यान जे नागरिक अजूनही मॅपिंगपासून वंचित राहिले आहेत, त्यांच्यासाठी प्रशासनातर्फे विशेष मोहीम राबवली जाणार असून बीएलओंद्वारे (BLO) थेट घरोघरी जाऊन त्यांचे अर्ज भरून घेण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

मतदानाचा हक्क प्रत्येकाला मिळावा यासाठी प्रशासन पूर्ण खबरदारी घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सुवर्ण विधानसौधमध्ये पार पडलेल्या या महत्त्वपूर्ण संयुक्त बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी आणि महानगरपालिकेचे महसूल उपायुक्त सिद्धू हुल्लोळी आदी उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.