belgaum

बेळगावातील रस्ते सुधारण्यासाठी केंद्राकडून १५ कोटींचा निधी

0
Shetter
 belgaum

बेळगाव लाईव्ह :केंद्रीय रस्ता पायाभूत सुविधा निधी (सीआरआयएफ) योजनेअंतर्गत बेळगाव लोकसभा मतदारसंघातील सुमारे २२ किलोमीटर लांबीच्या तीन प्रमुख रस्त्यांच्या सुधारणेसाठी केंद्र सरकारने १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाकडून या कामांना मंजुरी मिळाल्याने खासदार जगदीश शेट्टर यांनी समाधान व्यक्त केले आहे.

काही महिन्यांपूर्वी खासदार शेट्टर यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्र्यांची भेट घेऊन बेळगाव लोकसभा मतदारसंघातील खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावामध्ये सुमारे ८०.३३ किलोमीटर लांबीच्या नऊ रस्त्यांच्या दुरुस्ती व सुधारणेच्या कामांचा समावेश होता. या कामांसाठी अंदाजे ८६.४० कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली होती.

या मागणीची दखल घेत केंद्र सरकारने पहिल्या टप्प्यात तीन महत्त्वाच्या रस्त्यांच्या सुधारणेस मंजुरी दिली आहे. त्यामध्ये बेळगाव तालुक्यातील देसूर–नंदीहळ्ळी–कुकडोळी रस्ता (१२ किलोमीटर) सुधारण्यासाठी ८ कोटी रुपये, बिजगर्णी–कावळेवाडी–जानेवाडी–कर्ले–बहाद्दरवाडी–किनये ते राज्य महामार्ग क्रमांक ५४ जोडरस्ता (५ किलोमीटर) सुधारण्यासाठी ४ कोटी रुपये आणि बैलहोंगल तालुक्यातील चिवटगुंडी क्रॉस ते चिवटगुंडी रस्ता (५ किलोमीटर) सुधारण्यासाठी ३ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

 belgaum

एकूण १५ कोटी रुपयांच्या या निधीमुळे ग्रामीण भागातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होण्यास मदत होणार असून नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर होईल, असा विश्वास खासदार जगदीश शेट्टर यांनी व्यक्त केला आहे.

तसेच या कामांना मंजुरी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाचे त्यांनी आभार मानले आहेत. त्यांच्या सहकार्यामुळे बेळगाव लोकसभा मतदारसंघातील पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना मिळत असल्याचेही त्यांनी प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.