belgaum

व्यसनाच्या विळख्यातून भक्तिमार्गाकडे…

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह: गणेशोत्सव म्हटलं की आकर्षक सजावट, रोषणाई आणि देखावे आलेच. मात्र रघुनाथ पेठ, अनगोळ येथील सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ, शिवनेरी युवक मंडळाच्या मुलांनी यंदा केवळ मनोरंजन न करता समाजाला विचार करायला लावणारा सजीव देखावा साकारला आहे. ‘व्यसनातून मुक्तता’ हा यंदाच्या देखाव्याचा विषय असून, युवा पिढीला व्यसनांपासून दूर राहण्याचा संदेश यातून देण्यात आला आहे.

गेल्या पंधरा दिवसांपासून मंडळातील मुलांनी या देखाव्यासाठी मेहनत घेतली. संवाद, आवाज, पात्रांची तयारी आणि संपूर्ण सादरीकरणावर त्यांनी बारकाईने काम केले. त्यांच्या या मेहनतीतून साकारलेला देखावा आता गणेशभक्तांचे लक्ष वेधून घेत आहे.

गावातून शहरात आलेल्या मुलाची कहाणी

या सजीव देखाव्यात एका गावातील मुलाची कथा दाखवण्यात आली आहे. शिक्षणासाठी तो शहरात कॉलेजमध्ये येतो. नव्या वातावरणात त्याची ओळख काही व्यसनाधीन मित्रांशी होते आणि हळूहळू तोही व्यसनाच्या आहारी जाण्याच्या मार्गावर जातो.

 belgaum

मात्र याच काळात त्याला एक चांगला मित्र भेटतो. हा मित्र त्याला व्यसनापासून दूर नेत भक्तिमार्ग आणि चांगल्या विचारांची वाट दाखवतो. चुकीच्या संगतीमुळे आयुष्य कसे बदलू शकते आणि योग्य मित्राची साथ मिळाल्यास त्यातून बाहेर पडता येते, हा संदेश या देखाव्यातून देण्यात आला आहे.

विशेष म्हणजे, हा देखावा साकारताना मंडळातील मुलांनीच विविध भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या अभिनयातून साकारलेली ही कथा अधिक जिवंत आणि परिणामकारक ठरत आहे.

गणेशोत्सवाच्या पाचव्या दिवसापासून या सजीव देखाव्याला सुरुवात करण्यात आली असून, विसर्जनाच्या आदल्या दिवसापर्यंत तो सादर करण्याचा मंडळाचा प्रयत्न आहे. बेळगाव शहर आणि परिसरातील नागरिकांनी या सामाजिक संदेश देणाऱ्या सजीव देखाव्याला भेट देऊन मुलांच्या मेहनतीला दाद द्यावी, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.