belgaum

यरगट्टीत ‘प्रजासेवा’ आंदोलन सभा; शासकीय योजना घराघरात पोहोचविण्याचे उद्दिष्ट

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : राज्य सरकारच्या योजना प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविण्यासोबतच जनतेच्या समस्या आणि तक्रारींचे निराकरण करण्याच्या उद्देशाने ‘प्रजासेवा आंदोलन’ राबविण्यात येत आहे. नागरिकांना आपल्या समस्या घेऊन सरकारी कार्यालयांचे हेलपाटे मारावे लागू नयेत, यासाठी ही व्यवस्था करण्यात आल्याचे जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.

यरगट्टी येथील श्रीशैल मल्लिकार्जुन कल्याण मंडपात शनिवारी (१९ सप्टेंबर) यरगट्टी आणि सौंदत्ती तालुक्यांसाठी आयोजित प्रजासेवा आंदोलन सभेचे उद्घाटन करून ते बोलत होते.

राज्य सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर कार्यवाही करण्यासाठी ही व्यवस्था सुरू करण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांपासून नागरिकांकडून तक्रारी आणि अर्ज स्वीकारले जात असले, तरी नागरिकांना आपल्या समस्या घेऊन कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत. ही परिस्थिती टाळण्यासाठी स्वतंत्र यंत्रणेमार्फत तक्रारींचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे जारकीहोळी यांनी सांगितले.

सरकारच्या विविध योजनांचा लाभ गावातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचविणे आणि नागरिकांच्या तक्रारींची गुणवत्तापूर्ण पद्धतीने दखल घेणे हे प्रजासेवा आंदोलनाचे प्रमुख वैशिष्ट्य असल्याचे त्यांनी सांगितले.

 belgaum

महिन्यातून दोनदा प्रजासेवा आंदोलन

नागरिकांच्या वैयक्तिक तसेच सार्वजनिक समस्या सोडविण्यासाठी दर महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात प्रजासेवा आंदोलन आयोजित केले जाणार आहे. अधिकाऱ्यांनी केवळ अर्ज स्वीकारण्यापुरते मर्यादित न राहता, कायदेशीरदृष्ट्या शक्य असलेल्या समस्यांचे शक्य तिथे तातडीने निराकरण करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी सूचना जारकीहोळी यांनी केली.

आमदार विश्वास वैद्य यांनीही नागरिकांच्या घरापर्यंत प्रशासन पोहोचविण्याच्या उद्देशाने प्रजासेवा आंदोलन आयोजित करण्यात आल्याचे सांगितले. या उपक्रमामुळे नागरिकांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या समस्यांचे तातडीने निराकरण होण्यास मदत होईल, असे त्यांनी नमूद केले.

सभेत कृषी, हेस्कॉम, कामगार, सिंचन, खाण व भूविज्ञान, परिवहन आणि शिक्षण विभागांसह विविध विभागांशी संबंधित नागरिकांच्या तक्रारी स्वीकारण्यात आल्या.

विविध योजनांच्या लाभांचे वितरण

पशुपालन व पशुवैद्यकीय सेवा विभागामार्फत लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला. यामध्ये मेंढी-मेक्यांच्या युनिटसाठी ९० हजार रुपयांच्या अनुदानाचे धनादेश, आकस्मिक मृत्यू झालेल्या मोठ्या जनावरांच्या मालकांना प्रत्येकी १५ हजार रुपयांच्या नुकसानभरपाईचे धनादेश, शेतकऱ्यांना चारा किट, फिरत्या मेंढपाळांना ओळखपत्र, पशुसखी महिलांना पशुसखी किट आणि कामगार विभागामार्फत कामगार किटचे वितरण करण्यात आले.

महसूल विभागाच्या सामाजिक सुरक्षा योजनांतर्गत विविध पेन्शन आदेशांच्या प्रतीही लाभार्थ्यांना देण्यात आल्या.

विविध विभागांना जमिनींचे हक्कपत्र

कुरुबगट्टी गावातील ९ एकर ३० गुंठे सरकारी जमीन कर्नाटक इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळासाठी वसतिगृह, क्रीडांगण आणि इतर इमारतींच्या बांधकामासाठी मंजूर करण्यात आली. या जमिनीचे हक्कपत्र संबंधित विभागाकडे हस्तांतरित करण्यात आले.

तसेच कुरुबगट्टी येथील ३ एकर ३६ गुंठे जमीन प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या बांधकामासाठी शिक्षण विभागाला देण्यात आली. याशिवाय तावगेरी गावातील होळेव समाजातील नागरिकांना घरकुल अथवा भूखंडासाठी मंजूर करण्यात आलेल्या जमिनीचे हक्कपत्रही संबंधितांकडे सुपूर्द करण्यात आले.

यावेळी वायव्य कर्नाटक परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष सुनील हनुमन्नावर, जिल्हा पालक सचिव संजय शेट्टण्णावर, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, अपर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.