belgaum

सांडपाण्यामुळे सराफ कॉलनीतील विहिरी, बोअरचे पाणी दूषित

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : टिळकवाडी येथील अजिंठा हॉटेलच्या मागील बाजूस असलेल्या सराफ कॉलनी परिसरात ड्रेनेजच्या सांडपाण्याची गळती होत असल्याने येथील सहा खुल्या विहिरी आणि एका बोअरवेलचे पाणी दूषित झाल्याची गंभीर बाब समोर आली आहे. पिण्याच्या आणि दैनंदिन वापराच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात असून प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, परिसरातील ड्रेनेज पाईपलाईनच्या मॅनहोल्समधून सातत्याने सांडपाणी झिरपत आहे. हे सांडपाणी जमिनीत मुरून भूगर्भातील जलस्रोतांपर्यंत पोहोचत असल्याने विहिरी आणि बोअरवेलमधील पाण्याची गुणवत्ता बिघडली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. काही विहिरींमध्ये पाण्याचा रंग आणि वास बदलल्याचेही स्थानिक रहिवाशांनी सांगितले आहे.

या विहिरी आणि बोअरवेलमधील पाणी अनेक कुटुंबांकडून पिण्यासह घरगुती वापरासाठी वापरले जाते. त्यामुळे दूषित पाण्यामुळे जलजन्य आजारांचा धोका वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींना याचा अधिक फटका बसू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

 belgaum

स्थानिक नागरिकांनी महापालिका आणि संबंधित विभागाकडे वारंवार तक्रारी केल्याचे सांगितले असून, समस्या कायम असल्याचा आरोप केला आहे. नागरिकांनी ड्रेनेज पाईपलाईनची संपूर्ण तपासणी करून गळतीची ठिकाणे तातडीने दुरुस्त करावीत, अशी मागणी केली आहे. तसेच विहिरी आणि बोअरवेलमधील पाण्याचे नमुने तपासून त्याचा अहवाल सार्वजनिक करावा, अशीही मागणी पुढे आली आहे.

परिसरातील भूगर्भातील पाण्याचे वाढते दूषितीकरण थांबवण्यासाठी आणि नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे मत रहिवाशांनी व्यक्त केले आहे. योग्य वेळी उपाययोजना न झाल्यास ही समस्या अधिक गंभीर स्वरूप धारण करू शकते, अशी चिंता नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.