बेळगाव लाईव्ह : कर्नाटक-महाराष्ट्र सीमा प्रश्नासंदर्भात मंगळवार, ३० जून रोजी होणारी उच्चाधिकार समितीची बैठक लांबणीवर टाकण्यात आल्याने या निर्णयावर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर Sanjay Raut यांनी महाराष्ट्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.
राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना, मराठी माणूस, मराठी भाषा आणि संस्कृतीबाबत राज्य सरकारची अनास्था चिंताजनक असल्याचा आरोप केला. सीमा प्रश्नासारख्या संवेदनशील विषयावर बैठक पुढे ढकलणे हे दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटले.
यावेळी त्यांनी, “सरकार नेमकं कुणाला घाबरत आहे? मराठी जनतेच्या भावना आणि सीमा प्रश्नाकडे सरकारने दुर्लक्ष करू नये,” असा सवाल उपस्थित केला.

कर्नाटक-महाराष्ट्र सीमा प्रश्न हा अनेक दशकांपासून प्रलंबित असून सर्वोच्च न्यायालयातही याप्रकरणी सुनावणी सुरू आहे. अशा परिस्थितीत उच्चाधिकार समितीची बैठक लांबणीवर गेल्याने सीमाभागातील मराठी भाषिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
दरम्यान, बैठक पुढे ढकलण्यामागील नेमके कारण अद्याप अधिकृतपणे स्पष्ट करण्यात आलेले नाही. मात्र, या निर्णयामुळे सीमा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.




