belgaum

जीव धोक्यात घालून पार पाडली मोहीम!

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : गोव्यातील सत्तरी तालुक्यातील सुरल (सुर्ल) धबधब्यात बुडालेल्या 20 वर्षीय तरुणाचा मृतदेह अखेर बेळगावच्या रेस्क्यू पथकाच्या अथक प्रयत्नांनंतर बाहेर काढण्यात आला. मुसळधार पाऊस, प्रचंड पाण्याचा वेग आणि दुर्गम परिसरामुळे ही मोहीम अत्यंत आव्हानात्मक ठरली. मात्र बेळगावच्या स्वयंसेवी रेस्क्यू टीमने स्थानिक यंत्रणांच्या मदतीने जीवाची पर्वा न करता शोधमोहीम पूर्ण केली.

मृत तरुणाची ओळख आदित्य दीपककुमार सत्पती (वय 20) अशी झाली आहे. तो मित्रांसोबत सुरल धबधब्यावर सहलीसाठी गेला होता. धबधब्याच्या पाण्यात उतरल्यानंतर पाण्याची खोली आणि वेगवान प्रवाहाचा अंदाज न आल्याने तो बुडाला. मित्रांनी तातडीने मदतीचा प्रयत्न केला, मात्र त्याला वाचवता आले नाही.

घटनेनंतर वाळपई पोलीस, अग्निशमन दल आणि म्हादई अभयारण्य प्रशासनाने शोधमोहीम सुरू केली. मात्र मुसळधार पाऊस आणि वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहामुळे रविवारी रात्री शोधकार्य थांबवावे लागले.

 belgaum

सोमवारी सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली. यावेळी बेळगावच्या रेस्क्यू पथकातील अवधूत तुडवेकर, पदमप्रसाद हुली, विक्की मेहता, शुभम हुली, मायकल पिंटो, रोशन तनावडे आणि आकाश यांनी स्थानिक यंत्रणांसोबत समन्वय साधत अनेक तास शोधकार्य केले. अखेर आदित्यचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले.

सलग अनेक तास पाण्यात राहिल्यामुळे मृतदेहाची अवस्था गंभीर झाली होती. पोलिसांनी पंचनामा करून आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.

आदित्य हा मूळचा ओडिशाचा रहिवासी असून त्याचे कुटुंब सध्या बेळगावमध्ये वास्तव्यास आहे. त्याचे वडील भारतीय नौदलातून निवृत्त अधिकारी आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून बेळगावमध्येही हळहळ व्यक्त होत आहे.

विशेष: या घटनेत बेळगावच्या स्वयंसेवी रेस्क्यू पथकाने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत केलेल्या धाडसी कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांच्या तत्परतेमुळे आव्हानात्मक परिस्थितीतही शोधमोहीम यशस्वीरीत्या पूर्ण झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.