बेळगाव लाईव्ह : शेतकऱ्याचे आणि त्याच्या बैलाचे नाते हे केवळ मालक आणि जनावराचे नसते, तर ते विश्वास, कष्ट आणि भावनांचे असते. शेतातील राबणारा बैल हा अनेकदा कुटुंबातील सदस्याप्रमाणेच जपला जातो. बेळगाव शहरातील वडगाव येथील पाखरे कुटुंबाने हेच नाते एका अनोख्या पद्धतीने जपले आहे.
कारभार गल्लीतील पाखरे कुटुंबाचा लाडका ‘नाग्या’ बैल दोन वर्षांपूर्वी निधन पावला. शेतीच्या कामात खांद्याला खांदा लावून उभा राहिलेला हा बैल केवळ शेतीपुरता मर्यादित नव्हता. बैलगाडा शर्यतींमध्येही त्याने अनेक ठिकाणी यश मिळवत आपल्या मालकाचे नाव मोठे केले होते. प्रत्येक विजयासोबत ‘नाग्या’ हा पाखरे कुटुंबाचा अभिमान बनत गेला.
नाग्याच्या निधनानंतर त्याची उणीव कुटुंबाला सतत जाणवत होती. घरातील एखादा सदस्य गेल्याप्रमाणे निर्माण झालेली पोकळी आजही भरून निघालेली नाही. त्यामुळे त्याच्या आठवणी कायमस्वरूपी जपण्यासाठी कुटुंबाने नाग्याची मूर्ती तयार करण्याचा निर्णय घेतला.
विशेष म्हणजे, एखाद्या देवतेच्या किंवा मान्यवराच्या मूर्तीप्रमाणेच नाग्याच्या मूर्तीची आज वडगाव परिसरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात, भावनिक वातावरणात ही मिरवणूक पार पडली. त्यानंतर ही मूर्ती पाखरे कुटुंबाच्या घरासमोर विधिवत प्रतिष्ठापित करण्यात येणार आहे. सोमवारी रात्री वडगाव परिसरात या नाग्या बैलाच्या पुतळ्याची मिरवणूक काढण्यात आली. माजी नगरसेवक मनोहर हलगेकर यांच्यासह पाटील आदी यावेळी उपस्थित होते.

पाखरे कुटुंबासाठी ‘नाग्या’ हा फक्त बैल नव्हता; तो त्यांच्या कष्टाचा साथीदार, शर्यतीतील विजेता आणि घराचा सदस्य होता. त्यामुळे त्याच्या स्मृती कायम जिवंत राहाव्यात, या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला आहे.
आजच्या यांत्रिकीकरणाच्या युगात बैलांचे महत्त्व कमी होत असले, तरी शेतकरी आणि गोधन यांच्यातील भावनिक नाते अजूनही तितकेच घट्ट असल्याचे हे उदाहरण अधोरेखित करते. वडगावातील ही अनोखी घटना केवळ एका बैलाच्या स्मृतीची नाही, तर माणूस आणि मुक्या प्राण्यातील जिव्हाळ्याच्या नात्याला दिलेला हृदयस्पर्शी सलाम आहे.




