बेळगाव लाईव्ह :गेल्या तीन-चार महिन्यांपासून बंद असलेले वृद्धापवेतन पुन्हा सुरू करण्यासाठी सध्या बेळगाव तहसीलदार कार्यालयामध्ये वयोवृद्धांची गर्दी होत असून त्यांच्या मोठ्या रांगा लागल्याचे पहावयास मिळत आहे. तसेच रांगेत तासंतास ताटकळत उभे राहावे लागत असल्याने त्यांच्यात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
गेल्या कांही महिन्यांपासून बंद असलेले आपले वृद्धापवेतन पुन्हा सुरू केले जावे यासाठी वयोवृद्धांना सध्या बेळगाव तहसीलदार कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. वयोवृद्धांना संध्या सुरक्षा पेन्शन योजनेतून मासिक 1200 रुपये वृद्धापवेतन मिळते.
वेतनाची रक्कम दरमहा 1 ते 7 तारखेपर्यंत लाभार्थींच्या बँक अथवा पोस्ट खात्यामध्ये जमा केली जाते. मात्र गेल्या तीन-चार महिन्यात ती जमा न झाल्यामुळे तहसीलदार कार्यालयात वयोवृद्ध स्त्री -पुरुष नागरिकांच्या मोठ्या रांगा लागल्याचे पहावयास मिळत आहे.

बेळगाव जिल्ह्यामध्ये एकूण 7 लाख 54 हजार वृद्धापवेतनधारक असून त्यापैकी लाखाहून अधिक बोगस वेतनधारक असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे तहसीलदार कार्यालयात कागदपत्रांची पडताळणी करून वृद्धापवेतन का थांबवण्यात आली आहे याची माहिती दिली जात आहे.
तथापि घडल्या सर्व प्रकारांमध्ये गरजवंत वयोवृद्धांचे हाल होत आहेत. कारण या वयोवृद्धांपैकी काहींचा पोटापाण्याचा, तर बहुतांश जणांचा महिन्याचा औषध पाण्याचा खर्च वृद्धापवेतनाच्या रकमेतून निघत होता.
वृद्धापवेतनावर अवलंबून असलेल्या गरजवंत ज्येष्ठ नागरिकांपैकी एक असलेल्या रामनगर, वड्डरवाडी येथील 72 वर्षीय लक्ष्मी जाधव या वृद्धेला बेळगाव लाईव्ह समोर आपली व्यथा मांडताना रडू कोसळले. पोटची विवाहित मुले व सुनानी घराबाहेर काढल्यानंतर लक्ष्मी या भाड्याच्या घरात राहत होत्या. मात्र ते घर देखील मुलांनी पेटवून दिल्यामुळे कपडेलत्ते, चीजवस्तू जळून लक्ष्मी जाधव यांच्यावर निराधार जीवन जगण्याची वेळ आली आहे.
मिळणाऱ्या वृद्धापवेतनावर महिनाभर कशीबशी त्यांची पोटापाण्याची व्यवस्था होत होती. मात्र गेल्या तीन महिन्यापासून त्यांचे वृद्धापवेतन बंद झाल्यामुळे त्यांची मोठी परवड होत आहे. भीक मागून इंदिरा कॅन्टीनच्या आधारावर सध्या आपण जगत आहोत असे सांगताना स्वाभिमानी लक्ष्मी जाधव यांना दुःख अनावर होऊन रडू कोसळले. तरी सरकारने आपल्याकडे त्वरित लक्ष देऊन आपले वृद्धापवेतन पूर्ववत सुरु करावे, अशी मागणी त्यांनी केली.




