बेळगाव लाईव्ह :बैलूर क्रॉस येथे गेल्या मे महिन्यात घडलेल्या सुवर्ण कारागीर दरोडा प्रकरणातील सर्व सात आरोपींना बेळगाव येथील जिल्हा मुख्य न्यायाधीशांनी सशर्त जामीन मंजूर केला आहे.
जामीन मंजूर झालेल्या आरोपींची नावे रुबीयल गाझी, हुसेनअली मेडल, विवेक चंद्रकांत पाटील (रा. तांगडी गल्ली बेळगाव), प्रशांत महादेव चव्हाण (रा. कपलेश्वर रोड), नितीन राजाराम चव्हाण (खासबाग), दिगंबर नागेश पाटील (रा. शिवशक्तीनगर अनगोळ) आणि मयूर राजू घाडी (रा. बसवान गल्ली शहापूर) अशी आहेत.
प्रकरणाची थोडक्यात माहिती अशी की, फिर्यादी सध्या जोशी गल्ली, शहापूर येथे राहणारा पश्चिम बंगाल येथील सुवर्ण कारागीर एस. के. इबादुल गेल्या 20 मे 2026 रोजी सायंकाळी आपले मित्र रुबीयल गाझी व हुसेनअली मेडल यांना सोबत घेऊन गोव्याला निघाला होता. त्यावेळी बैलूर क्रॉस येथे त्यांच्या कार गाडीला मागून आलेल्या दोन कार गाड्यांनी ओव्हरटेक करून अडविले.
त्यानंतर त्या कार गाड्यांमधून उतरलेल्या अज्ञातांनी हातातील पिस्तूल, चाकू व काठ्यांचा धाक दाखवून फिर्यादी व त्याच्या दोन्ही मित्रांजवळील रोख 1 लाख 2000 रुपये, फिर्यादीचा मित्र गाझी याच्याकडून 225 ग्रॅम सोन्याचे बिस्किट आणि 20 ग्रॅमच्या पाटल्या हिसकावून घेऊन पोबारा केला होता. तत्पूर्वी घडला प्रकार पोलिसांना कळविल्यास जीवे मारण्याची धमकी दरोडेखोरांनी फिर्यादी व त्याच्या मित्रांना दिली होती.
त्यानंतर फिर्यादी इबादुल याने 23 मे रोजी खानापूर पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध फिर्याद दाखल केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेऊन उपरोक्त तिघा जणांना अटक केली. त्याचप्रमाणे त्यांच्या जवळील पिस्तूल, चाकू व इतर हत्यारे जप्त करण्यात आली होती. या प्रकरणातील अन्य एक आरोपी सचिन लुमाण्णा पाटील (रा. महाद्वार रोड, बेळगाव) हा अद्याप फरारी आहे. अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींनी बेळगाव येथील जिल्हा मुख्य न्यायाधीशांसमोर जामीनासाठी अर्ज दाखल केला होता.
सदर जामीन अर्जावर सुनावणी होऊन 50 हजार रुपयांचे वैयक्तिक हमीपत्र, 50 हजार रुपयांचे दोन जामीनदार आणि दर रविवारी खानापूर पोलीस ठाण्यामध्ये हजेरी लावणे, या अटींवर सर्व आरोपींना न्यायाधीशांनी जामीन मंजूर केला आहे. आरोपींच्यावतीने ॲड. प्रताप यादव, ॲड. हेमराज बेंचन्नावर, ॲड. स्वप्निल नाईक, ॲड. प्रज्वला अथनीमठ आणि ॲड. निकिता घाटगे हे काम पाहत आहेत.




