बेळगाव लाईव्ह:प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत राबविल्या जाणाऱ्या देशव्यापी पीएम-व्हीबीआरवाय कार्यक्रमाचा एक भाग म्हणून येत्या शुक्रवार दि. 19 जून 2026 रोजी हुबळी आणि बेळगाव येथे पीएम -व्हीबीआरवाय राज्यस्तरीय जनसंपर्क कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती हुबळीचे प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी आयुक्त विलांजन गुप्ता यांनी दिली.
बेळगाव शहरात आज बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. आयुक्त गुप्ता यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 15 ऑगस्ट 2025 रोजी सुरू केलेली पीएम-व्हीबीआरवाय ही एक ऐतिहासिक रोजगार संलग्न प्रोत्साहन योजना असून मोठ्या प्रमाणावर औपचारिक रोजगार निर्मितीला प्राधान्य देणे आणि देशभरात सामाजिक सुरक्षेची व्याप्ती वाढवणे हा या योजनेचा उद्देश आहे.
या योजनेद्वारे दोन वर्षाच्या कालावधीत 3.5 कोटीहून अधिक नोकऱ्यांच्या निर्मितीला प्रोत्साहन मिळण्याची अपेक्षा आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ), प्रादेशिक कार्यालय हुबळी यांच्यातर्फे प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत (पीएम-व्हीबीआरवाय) येत्या शुक्रवार दि. 19 जून 2026 रोजी देशपांडे फाउंडेशन सभागृह, बीव्हीबी कॅम्पस विद्यानगर, हुबळी आणि बेळगाव फाउंड्री क्लस्टर, अनगोळ औद्योगिक वसाहत उद्यमबाग, बेळगाव येथे राज्यस्तरीय जनसंपर्क कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे.

हुबळी आणि बेळगाव येथील हे कार्यक्रम देशव्यापी पीएम-व्हीबीआरवाय कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आयोजित केले जाणार आहेत. नवी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे होणाऱ्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पंतप्रधान नरेंद्र मोदी भूषवणार असून त्याचवेळी देशभरातील औद्योगिक समूहांमध्ये आणि राज्यांच्या राजधान्यांमध्ये असे कार्यक्रम एकाच वेळी आयोजित केले जात आहेत. या कार्यक्रमांमध्ये नवी दिल्ली येथील पंतप्रधानांच्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपणही दाखवले जाईल.
पीएम-व्हीबीआरवाय आणि सामाजिक सुरक्षा लाभांबद्दल जागरूकता वाढवणे, मान्यवर नियोक्ते आणि लाभार्थी यांच्यात संवादाची सोय करणे, नव्याने रोजगार मिळालेल्या कामगारांना नियुक्ती पत्रांचे वाटप करणे आणि कामगार कल्याण उपक्रम व अलीकडील कामगार सुधारणा बाबत जागरूकता निर्माण करणे हा पीएम-व्हीबीआरवाय राज्यस्तरीय जनसंपर्क कार्यक्रम आयोजित करण्यामागचा उद्देश आहे
अशी माहिती देऊन हे कार्यक्रम रोजगार प्रणित वाढ, कार्य बलांचे औपचारिकरण आणि कामगारांसाठी सामाजिक सुरक्षेची व्याप्ती बळकट करण्याप्रती सरकारची बांधिलकी अधोरेखित करतात, असे हुबळीचे प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी आयुक्त विलांजन गुप्ता यांनी शेवटी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेस प्रवर्तन अधिकारी महेश शिंदे आणि भविष्य निर्वाह निधी अधिकारी शुभम मीना उपस्थित होते.




