बेळगाव लाईव्ह : रविवारपासून सुरू झालेल्या आणि सोमवारी सूर्योदयालाही असलेल्या पवित्र ‘सोमवती अमावस्येचे’ विशेष धार्मिक महत्त्व अधोरेखित करत, येथील प्रसिद्ध श्री महालक्ष्मी मंदिरात हा उत्सव अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. यावर्षी अधिक मासाचा दुर्मिळ योग आणि त्यातच कालपासून सुरू झालेली ही सोमवती अमावस्या यामुळे या सोहळ्याचे महत्त्व अधिकच वाढले होते.
या मंगल पर्वावर श्री महालक्ष्मीच्या दर्शनासाठी बेळगाव जिल्ह्यासह सीमाभागातील हजारो भाविकांनी सुळेभावीत अभूतपूर्व गर्दी केली होती. देवीच्या दर्शनासाठी बेळगावसह आसपासच्या शेकडो गावांमधून हजारो भाविकांनी हजेरी लावली होती.
सोमवारी येणाऱ्या अमावस्येचे विशेष महत्त्व लक्षात घेऊन मंदिर प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली होती. पहाटेच्या मंगल मुहूर्तावर श्री महालक्ष्मी देवीला अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर विविध रंगीबेरंगी आणि सुवासिक फुलांचा वापर करून गाभाऱ्याची केलेली नयनरम्य सजावट भाविकांचे डोळे दिपवून टाकत होती.
या जागृत देवस्थानच्या दर्शनासाठी सकाळपासूनच मंदिर परिसरात अभूतपूर्व गर्दी पाहायला मिळाली. अबालवृद्धांसह महिला भाविकांची संख्या लक्षणीय होती. कडक शिस्तीत आणि उत्साही वातावरणात भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. मंदिर परिसरात लागलेल्या लांबच लांब रांगांमुळे संपूर्ण परिसराला एखाद्या मोठ्या यात्रेचे स्वरूप आले होते.
हिंदू धर्मात सोमवती अमावस्येला दानधर्म आणि प्रदक्षिणा घालण्याला मोठे महत्त्व आहे. हीच परंपरा जपत अनेक भाविकांनी मंदिरात प्रदक्षिणा घालून आपल्या कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी महालक्ष्मी चरणी साकडे घातले.सूर्यास्तानंतर मंदिरात वेदघोषाच्या जयघोषात भव्य दीपप्रज्वलन करण्यात आले.
शेकडो दिव्यांच्या प्रकाशाने न्हाऊन निघालेले मंदिर आणि परिसर पाहून उपस्थित भाविक भक्तीरसात लीन झाले होते. रात्री उशिरापर्यंत भाविकांची ये-जा सुरूच असल्यामुळे आज सुळेभावी गावात चैतन्याचे आणि मंगलमय वातावरण निर्माण झाले होते.




