बेळगाव लाईव्ह : सीमाभागातील मराठी भाषिक जनतेवर प्रशासनाकडून होत असलेली बेकायदा कन्नडसक्ती रोखण्यासाठी आणि शासकीय कागदपत्रे मराठी भाषेतूनच मिळावीत या प्रमुख मागणीसाठी, मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने सोमवार, दिनांक २२ जून २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता बेळगाव येथील धर्मवीर संभाजी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयावर एका विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाच्या पूर्वतयारीसाठी खानापूर तालुका म. ए. समितीच्या वतीने खानापूर बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर पत्रके वाटून जोरदार जनजागृती मोहीम राबविण्यात आली.
खानापूर शहरात झालेल्या या मोहिमेत खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई, तसेच तालुक्याचे माजी आमदार दिगंबर पाटील आणि समितीचे इतर सर्व प्रमुख पदाधिकारी स्वतः बाजारपेठेत फिरून नागरिकांना माहिती पत्रके वाटत होते. या वेळी उपस्थित नेत्यांनी शासकीय आणि अधिकृत कागदपत्रे स्थानिक मराठी भाषिकांना त्यांच्या मातृभाषेतूनच मिळाली पाहिजेत, अशी ठाम मागणी केली.
भाषिक अल्पसंख्याकांच्या घटनात्मक तरतुदींनुसार, ज्या भागात विशिष्ट भाषा बोलणाऱ्यांची संख्या १५ टक्क्यांपेक्षा जास्त आहे, तिथे त्यांच्या भाषेत शासकीय परिपत्रके व सेवा देणे बंधनकारक आहे. बेळगाव व सीमाभागात मराठी भाषिकांची संख्या ५१ ते ८५ टक्क्यांपर्यंत असूनही प्रशासनाकडून मराठीची गळचेपी केली जात आहे. गेल्या वर्षी ११ ऑगस्ट २०२५ रोजी काढलेल्या मोर्च्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी यावर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र त्याची कोणतीही अंमलबजावणी झाली नाही. उलट, आता व्यापारी आस्थापने, नामफलक आणि सामाजिक कार्यक्रमांवर केवळ कन्नड वापरण्याचा दबाव आणला जात आहे.
या पार्श्वभूमीवर, “२२ जून रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना मराठी समाजाची एकजूट आणि ताकद दिसली पाहिजे, तरच जिल्हा प्रशासनाला या विषयाचे गांभीर्य समजेल,” असे आवाहन अध्यक्ष गोपाळ देसाई यांनी केले. माजी आमदार दिगंबर पाटील यांनीही सर्व मराठी बांधवांनी कोणत्याही परिस्थितीत न विसरता या मोर्च्याला बहुसंख्येने उपस्थित राहून आपली अस्मिता जपण्याचे आवाहन केले.
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने सर्व व्यापारी, कारखानदार, वकील, शिक्षक, गणेशोत्सव मंडळे आणि मराठी भाषिक नागरिकांना २२ जून रोजी सकाळी ११ वाजता धर्मवीर संभाजी चौकात मोठ्या संख्येने गोळा होऊन हा विराट मोर्चा यशस्वी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, व्यापारी बंधूंनी आपल्या नामफलकांवर कन्नडसोबत मराठी भाषेचाही वापर करावा, अशी सूचनाही समितीने केली आहे.




