belgaum

मुलाच्या फीचे 80 हजारही चोरले!कष्टकरी आईवर चोरट्यांचा घाला

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह:
पतीच्या निधनानंतर कष्ट करून संसाराचा गाडा ओढणाऱ्या आणि मुलांच्या भवितव्यासाठी दिवस-रात्र मेहनत करणाऱ्या एका विधवा महिलेवर चोरट्यांनी मोठा आघात केला आहे. खासबाग येथील सीमा उत्तम वंजारे यांच्या बंद घरात घरफोडी करून चोरट्यांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मुलाच्या हॉस्टेल फीकरिता कष्टाने जमवलेली 80 हजार रुपयांची रोकडही लंपास केली.

जुना पी.बी. रोड परिसरातील जयवंती मंगल कार्यालयाजवळील पाटील गल्ली येथे रविवारी मध्यरात्री ही घटना घडली. पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या सीमा वंजारे या रविवारी रात्री काम आटोपून घरी आल्या होत्या. रात्री उशिरा त्या काकतीवेस येथे राहणाऱ्या आपल्या मोठ्या मुलीकडे जेवणासाठी गेल्या. उशीर झाल्याने त्यांनी मुलीच्या घरीच मुक्काम करण्याचा निर्णय घेतला. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या घराला लक्ष्य केले.

सीमा वंजारे यांना मुलगा व मुलगी अशी दोन अपत्ये आहेत. मुलाच्या शिक्षणासाठी आणि हॉस्टेल फी भरण्यासाठी त्यांनी अत्यंत कष्टाने 80 हजार रुपये साठवले होते. मात्र चोरट्यांनी ही रक्कमही सोडली नाही. घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केल्यानंतर त्यांनी घरातील सामानाची उलथापालथ केली. स्वयंपाकघरातील गोदरेज कपाट आणि इतर कपाटे फोडून सुमारे चार तोळे सोन्याचे दागिने, 20 ते 25 तोळे चांदीचे साहित्य आणि 80 हजार रुपयांची रोकड असा सुमारे पाच लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला.

विशेष म्हणजे चोरी करून जाताना चोरट्यांनी घराचा दरवाजा पुन्हा पूर्ववत लावून ठेवला होता. त्यामुळे सोमवारी सकाळपर्यंत शेजाऱ्यांनाही चोरीची कल्पना आली नाही. दुपारी कामावरून परतलेल्या सीमा वंजारे यांना घराचे कुलूप तुटलेले दिसले. घरात प्रवेश केल्यानंतर कपाटे फोडलेली आणि सामान अस्ताव्यस्त पडलेले पाहून त्यांना मोठा धक्का बसला.

 belgaum

घटनेची माहिती मिळताच शहापूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चोरट्यांचा शोध सुरू आहे.

मुलांच्या शिक्षणासाठी पै-पै साठवणाऱ्या एका कष्टकरी आईच्या आयुष्यभराच्या मेहनतीवर चोरट्यांनी एका रात्रीत पाणी फेरल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.