belgaum

बेनकनहळळी टाऊन पंचायतविरोधात ग्रामस्थांचा एल्गार

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : तालुक्यातील बेनकनहळळी येथे मूलभूत सुविधांचा प्रचंड अभाव आणि टाऊन पंचायत प्रशासनाचा ढिसाळ कारभार यांविरोधात ग्रामस्थांनी एकत्र येत थेट प्रशासनाविरोधात शिंग फुंकले आहे. गावातील सांडपाण्याची चुकीची विल्हेवाट, अचानक करण्यात आलेली भरमसाठ घरपट्टी वाढ आणि पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या यांमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांचा संयम सुटला असून, ‘ग्रामस्थ पंच कमिटी’ आणि बेनकनहळळीच्या शेकडो नागरिकांनी एकत्र येत टाऊन पंचायत प्रशासनाविरोधात एक भव्य आणि आक्रमक आंदोलन छेडले.

प्रशासनाने गावातील मूलभूत समस्या सोडवण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोप करत नागरिकांनी या गलथान कारभाराचा तीव्र निषेध केला. जर प्रशासनाने या मागण्यांवर तातडीने तोडगा काढला नाही, तर आगामी काळात संपूर्ण गाव रस्त्यावर उतरवून यापेक्षाही उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आंदोलकांनी यावेळी दिला.

या आंदोलनादरम्यान ग्रामस्थांनी प्रशासनाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला. गावातील गटारींचे मैलायुक्त आणि घाण पाणी थेट एका नाल्यामध्ये सोडले जात असून, त्यामुळे संपूर्ण परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. सर्वात गंभीर बाब म्हणजे, हेच दूषित पाणी गावातील पिण्याच्या पाण्याच्या विहिरींमध्ये झिरपून मिसळत असल्याने संपूर्ण बेनकनहळळी गावातील नागरिकांच्या आणि लहान मुलांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. या साथीच्या आजारांच्या भीतीसोबतच टाऊन पंचायतीने सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक भुर्दंड लादला आहे. पंचायतीकडून घरपट्टीमध्ये कोणत्याही ठोस कारणाशिवाय भरमसाठ वाढ करण्यात आली असून, नागरिकांमधून या वाढीव घरपट्टीला तीव्र विरोध होत आहे. ही अन्यायकारक घरपट्टी तातडीने कमी करून पूर्वीप्रमाणे करण्यात यावी, अशी आग्रही मागणी आंदोलकांनी केली आहे.

 belgaum

यासोबतच, गावातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रशासनाने नियमित आणि पुरेशा प्रमाणात शुद्ध पाणीपुरवठा करावा, अशी मागणी करण्यात आली. गावातील पाण्याचा मुख्य स्त्रोत असलेल्या केबाळी नाल्यावर काही घटकांकडून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर अतिक्रमण करण्यात आले आहे, ज्यामुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह खंडित झाला आहे. हे अतिक्रमण तात्काळ हटवून पाण्याचा मार्ग मोकळा करावा, जेणेकरून पाण्याची समस्या काही प्रमाणात सुटू शकेल, असे ग्रामस्थांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. या सर्व मागण्यांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन योग्य ती ठोस कार्यवाही करावी, अन्यथा गावकऱ्यांचा रोष अधिक तीव्र होईल, असा इशारा ग्रामस्थ पंच कमिटीने दिला आहे.

ग्रामस्थ पंच कमिटीचे अध्यक्ष नागेश देसुरकर यांच्या नेतृत्वाखाली युवराज पाटील, मोहन कांबळे, लक्ष्मण खांडेकर, रमेश देसुरकर, चंद्रकांत पाटील, सदानंद देसुरकर, महेश पाटील आणि सहदेव काटकर आदींसह पंच कमिटीचे सर्व पदाधिकारी, सदस्य आणि बेनकनहळळी गावातील शेकडो महिला व पुरुष ग्रामस्थांनी उपस्थित राहून टाऊन पंचायत प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.