belgaum

धोकादायक टाकी हटणार! 8 दिवसात कारवाईचे आश्वासन

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह :जुने बेळगाव येथील सरकारी मराठी पूर्ण प्राथमिक शाळा क्र. 33 च्या आवारातील धोकादायक व जीर्ण झालेल्या पाण्याच्या टाकीची आज जिल्हा शिक्षणाधिकारी (डीडीपीआय) श्रीमती लीलावती हिरेमठ आणि गट शिक्षणाधिकारी (बीईओ) रवी बजंत्री यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी येत्या आठ दिवसांत निविदा प्रक्रिया पूर्ण करून सदर टाकी पाडून हटविण्याचे आश्वासन दिले.

शाळेच्या आवारात काँक्रीटच्या उंच खांबांवर उभारण्यात आलेली ही मोठी पाण्याची टाकी गेल्या दोन दशकांपासून वापराविना जीर्ण अवस्थेत आहे. कालांतराने तिची अवस्था अधिकच धोकादायक बनल्याने शाळेतील विद्यार्थ्यांसह परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. संभाव्य दुर्घटनेची शक्यता लक्षात घेऊन स्थानिक नागरिक आणि पालकांकडून टाकी तातडीने हटविण्याची मागणी सातत्याने केली जात होती.

या प्रश्नावर परिसरातील नागरिकांनी आंदोलनाचा इशाराही दिला होता. त्यानंतर अलीकडेच बेळगाव महापालिकेच्या कर्नाटक शहरी विकास पायाभूत सुविधा विभागाच्या अभियंत्यांनी शाळेला भेट देऊन टाकी हटविण्याबाबत सकारात्मक आश्वासन दिले होते.

 belgaum

आजच्या पाहणीवेळी शाळेच्या एसडीएमसी सदस्यांसह सामाजिक कार्यकर्ते संतोष शिवनगेकर, विनायक पाटील, विनायक कार्लेकर, मोहन बेनके, नितीन पाटील आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.

पाहणीनंतर शिक्षणाधिकाऱ्यांनी संबंधित विभागाकडून तातडीने निविदा प्रक्रिया राबवून आठ दिवसांत टाकी हटविण्याची कार्यवाही सुरू केली जाईल, असे स्पष्ट केले. तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने टाकी हटविण्याचे काम पूर्ण होईपर्यंत शाळा तात्पुरती अन्यत्र हलविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी अधिकाऱ्यांनी एसडीएमसी सदस्यांसमवेत पर्यायी जागेची पाहणी केली असून येत्या सोमवारपासून शाळा त्या ठिकाणी स्थलांतरित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.