belgaum

सवदत्ती यल्लम्मा डोंगरावर प्रशासनाचा कारवाईचा बडगा

0
Roshan mohammad dc
 belgaum

बेळगाव लाईव्ह : सवदत्ती येथील प्रसिद्ध यल्लम्मा डोंगरावर भाविकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अनधिकृत दुकानांवर आणि भेसळयुक्त अन्नपदार्थ विक्रेत्यांवर जिल्हा प्रशासनाने कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. मंदिर प्राधिकरणाच्या मुख्य अधिकारी प्रभावती फक्कीरपूर आणि बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबवण्यात आली असून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

यल्लम्मा डोंगर परिसरातील किराणा दुकाने, पूजा साहित्य विक्री केंद्रे आणि उपाहारगृहांची अचानक पाहणी करण्यात आली. या कारवाईदरम्यान मुदत संपलेली शीतपेये, कालबाह्य खाद्यपदार्थ, निकृष्ट दर्जाचे साहित्य आणि नियमबाह्य पद्धतीने औषधांची विक्री होत असल्याचे निदर्शनास आले. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे जुन्या व्यापारी संकुलातील शौचालयांचा वापर साठवणूक आणि स्वयंपाकघर म्हणून केला जात असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.

याप्रकरणी सर्व अस्वच्छ व भेसळयुक्त साहित्य जप्त करण्यात आले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानांचा वीज व पाणीपुरवठा तात्काळ खंडित करण्यात आला आहे. कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तसेच संबंधितांवर थेट एफआयआर नोंदवून क्रिमिनल गुन्हे दाखल करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

 belgaum

यल्लम्मा देवस्थानच्या संपूर्ण कायापालटासाठी २१५ कोटी रुपयांचा भव्य विकास प्रकल्प वेगाने सुरू असून, आगामी ६ ते ८ महिन्यांत आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. नवीन प्राधिकरणाकडे कारभार हस्तांतरित होत असताना सर्व कर्मचाऱ्यांनी अत्यंत जबाबदारीने काम केले पाहिजे, असे सांगत जिल्हाधिकाऱ्यांनी येत्या आठवड्यात स्वतः प्रत्यक्ष पाहणी करण्याचा निर्णय घेतला आहे. कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना थेट सेवेतून बडतर्फ केले जाईल, असा कडक इशारा बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.