बेळगाव लाईव्ह: गणेश विसर्जन मिरवणूक वेळेत पूर्ण करण्यासाठी विसर्जन तलावावर तासंतास आरती न करता केवळ दोन-तीन आरत्या करून वेळेचे नियोजन करावे, असे आवाहन पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांनी केले. आगामी गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर गणेश महामंडळ, लोकमान्य महामंडळ आणि विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत त्यांनी हे आवाहन केले.
गेल्या वर्षी बेळगावमधील गणेश विसर्जन मिरवणूक तब्बल ३६ तास चालली होती. यंदा मिरवणूक शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्यासाठी गणेश मंडळांनी सहकार्य करावे, अशी सूचना पोलीस आयुक्तांनी केली. विसर्जन तलावावर प्रत्येक मंडळाकडून आरतीसाठी ४० ते ४५ मिनिटांचा वेळ घेतला जात असल्याने आरतीचा कालावधी कमी करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. आरती वेळेतच आटोपती घेऊन विसर्जन प्रक्रिया सुरळीत करण्याचे आवाहन करण्यात आले.
विसर्जन मिरवणुकीत शेवटचा गणपती पाठविण्याबाबत मंडळांमध्ये स्पर्धा होऊ नये, अशी विनंतीही महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांना करण्यात आली. यंदा गणेश मूर्ती मोठ्या आकाराच्या असल्याने विसर्जनासाठी अधिक वेळ लागू शकतो. त्यामुळे मंडळांनी मर्यादित वेळेत आरती करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.
लेझर लाईटवर बंदी कायम
गणेश विसर्जनादरम्यान लेझर लाईटच्या वापरावर बंदी कायम ठेवण्यात आली आहे. सर्व गणेश मंडळांनी या नियमाचे पालन करावे, अशा सूचना पोलिसांकडून देण्यात आल्या. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. बाहेरील जिल्ह्यांतून पाच हजारांहून अधिक अतिरिक्त पोलिस कर्मचारी येणार असून, एकूण बंदोबस्ताची संख्या सहा ते सात हजारांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. बंदोबस्ताची संपूर्ण माहिती पुढील दोन दिवसांत स्पष्ट करण्यात येईल, असे पोलीस आयुक्तांनी सांगितले.
५०० हून अधिक नवीन सीसीटीव्ही कॅमेरे
गणेशोत्सवाच्या सुरक्षेसाठी ५०० हून अधिक नवीन सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. याशिवाय पोलीस विभागाचे आधीपासून कार्यरत असलेले सुमारे ६०० कॅमेरेही निगराणीसाठी वापरण्यात येणार आहेत. विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर अडचणी निर्माण झाल्यास तातडीने कार्यवाही करण्यासाठी विविध विभागांचे नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. डीसीपी लॉ अँड ऑर्डर, डीसीपी क्राइम, वन विभाग, केएसआरटीसी आणि एसडीआरएफसाठी स्वतंत्र नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. कोणतीही संशयास्पद बाब निदर्शनास आल्यास थेट पोलिसांशी संपर्क साधावा. पोलीस विभाग २४ तास उपलब्ध असून, नागरिकांच्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करण्यात येईल, असे पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांनी स्पष्ट केले. विसर्जन मिरवणूक सुरळीत आणि सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी गणेश मंडळे, महामंडळे आणि नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.





