belgaum

बेळगावमध्ये भविष्यात रणजी सामने; व्यंकटेश प्रसाद यांची ग्वाही

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : सध्या व्यावहारिक कारणांमुळे म्हैसूर, हुबळी आणि बेंगळुरू या तीन केंद्रांवर लक्ष केंद्रित करण्यात आले असले, तरी भविष्यात बीसीसीआयच्या रणजी ट्रॉफी आणि इतर प्रथम श्रेणी देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांचे सामने बेळगावमध्ये आयोजित करण्याचा निश्चित विचार केला जाईल, अशी ग्वाही कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेचे (केएससीए) अध्यक्ष आणि भारताचे माजी वेगवान गोलंदाज वेंकटेश प्रसाद यांनी दिली.


बेळगाव येथील केएससीए स्टेडियमला शनिवारी भेट दिल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी सांगितले की, हुबळी, म्हैसूर आणि बेंगळुरू या झोनमध्ये क्रिकेटचा दर्जा उंचावणे आणि नवोदित खेळाडूंना अधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी संघटना सातत्याने प्रयत्नशील आहे.


बेळगाव हे हुबळी विभागांतर्गत येत असून येथे क्रिकेटच्या विकासासाठी आवश्यक पायाभूत सुविधा, क्षमता आणि गुणवत्ता उपलब्ध आहे. त्यामुळे भविष्यात बीसीसीआयच्या १९ वर्षांखालील, २३ वर्षांखालील स्पर्धांसह प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यांचे आयोजन बेळगावमध्ये करण्याचा संघटनेचा प्रयत्न राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.

 belgaum


व्यंकटेश प्रसाद म्हणाले की, सध्या याबाबत कोणतीही ठोस योजना नसली तरी बेळगावमध्ये देशांतर्गत क्रिकेट सामने आयोजित करण्याबाबतचा दृष्टिकोन स्पष्ट आहे. क्रिकेट ग्रामीण भागांपर्यंत पोहोचवणे हा केएससीएचा उद्देश असून बेळगाव या योजनेतील महत्त्वाचा घटक आहे.


गेल्या पाच-सहा वर्षांत बेळगावच्या केएससीए मैदानाच्या देखभालीकडे काही प्रमाणात दुर्लक्ष झाले होते. मात्र, सुमारे सात महिन्यांपूर्वी नवीन कार्यकारिणी सत्तेवर आल्यानंतर मैदानांच्या विकासासाठी विशेष प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. बेळगावसह राज्यातील विविध क्रिकेट मैदानांचा दर्जा सुधारण्यावर भर दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले.


प्रत्येक शहरात मोठे स्टेडियम उभारण्यापेक्षा तरुण खेळाडूंना खेळण्यासाठी अधिकाधिक दर्जेदार ‘टर्फ’ मैदाने उपलब्ध करून देणे महत्त्वाचे आहे. एका आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्टेडियमपेक्षा तीन-चार चांगली टर्फ मैदाने अधिक खेळाडू घडवू शकतात, असे मतही त्यांनी व्यक्त केले. यावेळी अविनाश पोतद्दार यांच्यासह अन्य उपस्थित होते

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.