बेळगाव लाईव्ह : दोन कोटी रुपयांच्या विमा रकमेसाठी माजी सैनिकाचा खून करण्यात आल्याचा गंभीर आरोप समोर आला असून, या प्रकरणात मृताच्या पत्नीच्या प्रियकरानेच सेल्फी व्हिडिओद्वारे धक्कादायक खुलासे केल्याने खळबळ उडाली आहे.
हुक्केरी तालुक्यातील घोडगेरी येथील माजी सैनिक संदीप मांजरी यांच्या मृत्यू प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. मृताची पत्नी सुमासोबत संबंध असल्याचा दावा करणाऱ्या पुंडलिक डोंबर याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रसिद्ध करून अनेक गंभीर आरोप केले आहेत.
व्हिडिओमध्ये पुंडलिक डोंबरने सांगितले की, तो घोडगेरी येथे एग राईसचे दुकान चालवत होता. त्यावेळी संदीप मांजरी त्याच्याकडे येत असत. निवृत्तीनंतर संदीप यांनी चहाचे दुकान सुरू केले आणि कामगार मिळत नसल्याने त्याला स्वतःकडे कामासाठी बोलावून घेतले. त्यानंतर संदीप यांची पत्नी सुमाशी ओळख झाली आणि पुढे दोघांमध्ये जवळीक वाढल्याचा दावा त्याने केला आहे.
याचदरम्यान त्याने आणखी गंभीर आरोप करताना सांगितले की, सुमा घरात मोठ्या प्रमाणात मद्य आणि झोपेच्या गोळ्या ठेवत असे. संदीप यांना त्या देत असल्याचेही त्याने म्हटले आहे. याबाबत विचारणा केल्यावर “तो मेला तरी चालेल” असे सुमा सांगत असल्याचा आरोपही त्याने केला.
पुंडलिकच्या म्हणण्यानुसार, हुक्केरी यात्रेतून परतत असताना संदीप यांचा अपघात झाला होता. उपचारासाठी रुग्णालयात दाखल असताना सुमाने त्याला फोन करून कीटकनाशक औषध आणण्यास सांगितले. आपण ते औषध आणून दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी संदीप यांचा मृत्यू झाल्याने आपल्याला संशय आल्याचे त्याने व्हिडिओमध्ये म्हटले आहे.
तसेच, संदीप यांच्या नावावर दोन कोटी रुपयांचा विमा उतरविण्यात आला होता. विम्याची रक्कम मिळाल्यानंतर दोघांच्या मुलांना घेऊन बेळगावात स्थायिक होण्याचा विचार सुमा व्यक्त करत असल्याचा आरोपही त्याने केला आहे.

संदीप यांच्या मृत्यूनंतर आपण आणून दिलेले औषध आणि इतर वस्तू नष्ट करण्यास सुमाने सांगितल्याचा दावाही पुंडलिकने केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल पुनर्तपासणी व्हावी तसेच तपास पूर्ण होईपर्यंत विम्याची कोणतीही रक्कम वितरित करू नये, अशी मागणी त्याने केली आहे.
“मी सांगत असलेल्या गोष्टी खोट्या ठरल्या तर तुरुंगात जाण्यास तयार आहे,” असेही त्याने व्हिडिओमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी मंगळवारी संदीप मांजरी यांचा मृतदेह बाहेर काढून पुन्हा तपासणी व वैद्यकीय प्रक्रिया सुरू केली आहे. घोडगेरी गावातील हे प्रकरण सध्या जिल्हाभर चर्चेचा विषय बनले असून पोलिस तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




