बेळगाव लाईव्ह : बेळगाव महानगरपालिकेत कर्नाटकाच्या बाजूने सीमा ठराव संमत करण्याच्या मागणीवरून सुरू असलेल्या वादात आता बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. बेळगाव हा कर्नाटकाचा अविभाज्य भाग असताना महापालिकेत स्वतंत्र ठराव मांडण्याची गरज काय? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.
भाजपच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना शेट्टर म्हणाले की, बेळगावमध्ये मराठी, कन्नड तसेच इतर भाषिक नागरिक गुण्यागोविंदाने राहतात. सर्व समाजघटकांच्या परस्पर सहकार्यामुळे शहराचा विकास होत आहे. त्यामुळे अनावश्यक वाद निर्माण करण्यापेक्षा विकासाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.
कन्नड संघटनांनी महापालिकेत कर्नाटकाच्या समर्थनार्थ ठराव मंजूर करण्याची मागणी लावून धरली आहे. या पार्श्वभूमीवर प्रादेशिक आयुक्तांनी महापालिका आयुक्तांकडे अहवाल मागविल्याने हा विषय अधिक चर्चेत आला आहे. मात्र, बेळगावमध्ये दरवर्षी कर्नाटक विधिमंडळाचे अधिवेशन भरते. यावरूनच बेळगाव कर्नाटकाचा भाग असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे सीमा प्रश्नावर स्वतंत्र ठराव मांडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे शेट्टर यांनी सांगितले.

ठराव मंजूर झाला नाही म्हणून कर्नाटक सरकार महापालिका बरखास्त करेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. मात्र असा कोणताही प्रश्न उद्भवत नाही आणि राज्य सरकारदेखील तसा निर्णय घेणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी कळसा-भंडुरी प्रकल्पाचाही उल्लेख केला. कर्नाटक विधानसभेत या विषयावर दोन ठराव मंजूर झाले, मात्र त्यांची अंमलबजावणी अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे केवळ ठराव मंजूर करणे म्हणजे प्रश्न सुटणे नव्हे. बेळगावच्या विकासासाठी आवश्यक विषयांवर लक्ष केंद्रित करणे अधिक महत्त्वाचे असल्याचे शेट्टर यांनी नमूद केले.
महापालिकेतील सीमा ठरावाच्या मुद्द्यावरून सध्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चा रंगली असताना शेट्टर यांच्या वक्तव्यामुळे या वादाला नवे वळण मिळाले आहे.




