बेळगाव लाईव्ह:
वाढत्या रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी आणि दुचाकीस्वारांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी बेळगाव शहर पोलीस आयुक्तालयाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. हेल्मेट वापराबाबत जनजागृती करण्यासाठी 15 ते 21 जून 2026 या कालावधीत विशेष अभियान राबविण्यात येणार असून, त्याअंतर्गत 19 जूनपासून शहरात ‘हेल्मेट नाही, तर इंधन नाही’ हा उपक्रम सुरू केला जाणार आहे.
या मोहिमेअंतर्गत शहरातील सर्व पेट्रोल पंपांवर विशेष फलक लावण्यात येणार असून, हेल्मेट न घातलेल्या दुचाकीस्वारांना पेट्रोल अथवा इतर इंधन देण्यास नकार दिला जाणार आहे. यासाठी पोलीस आयुक्तालयाने सर्व पेट्रोल पंप चालक व मालकांना पत्र पाठवून या सामाजिक उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. तसेच संबंधित कर्मचाऱ्यांना हेल्मेटविना आलेल्या वाहनचालकांना इंधन न देण्याच्या सूचना दिल्या जाणार आहेत.
पोलीस प्रशासनाच्या मते, हा उपक्रम केवळ नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी नसून नागरिकांच्या जीविताचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत आहे. त्यामुळे पेट्रोल पंप चालक, स्वयंसेवी संस्था, शैक्षणिक संस्था तसेच सर्वसामान्य नागरिकांनी या अभियानाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे, अधिकृत अंमलबजावणी 19 जूनपासून सुरू होणार असली तरी शहरातील काही पेट्रोल पंपांनी हेल्मेट न घातलेल्या दुचाकीस्वारांना इंधन देण्यास आधीच नकार देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत हेल्मेट वापराबाबत अधिक जागरूकता निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
रस्ते अपघातमुक्त आणि सुरक्षित बेळगाव घडवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने वाहतूक नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन शहर पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी केले आहे.




