belgaum

खानापूरच्या विकासासाठी हलगेकरांची निधीची मागणी

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : खानापूर तालुक्यातील दीर्घकालीन प्रलंबित प्रश्न सोडविण्यासह सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी आमदार विठ्ठल हलगेकर यांनी बेळगाव येथे कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची भेट घेऊन विविध विकासकामांसाठी कोट्यवधी रुपयांच्या निधीची मागणी करणारे निवेदन सादर केले.


आमदार विठ्ठल हलगेकर यांनी सादर केलेल्या निवेदनात खानापूर तालुक्यातील सिंचन योजनांसाठी १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याची मागणी केली आहे. तसेच पारीश्वाड–अवरोळी योजनेसाठी ५० कोटी रुपये तसेच जळगा, शेडेगाळी, निलावडे आणि तोरळी या गावांतील नदीसंबंधित विकास योजनांसाठीही मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्याची विनंती करण्यात आली आहे.


याशिवाय, वनक्षेत्र आणि अतिवृष्टीग्रस्त भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खानापूर तालुक्यात वारंवार होणारे वीजपुरवठ्याचे खंडित होणे टाळण्यासाठी भूमिगत वीजवाहिन्या (UG Cable) टाकण्याची मागणी करण्यात आली.

 belgaum

तसेच बैलूर आणि कणकुंबी येथे नवीन वीज उपकेंद्रे उभारण्याबरोबरच भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन जांबोटी आणि कुंभार्डा येथे तातडीने नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रांना मंजुरी देण्याचीही विनंती करण्यात आली.


आमदार हलगेकर यांच्या या मागण्यांवर उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी सकारात्मक प्रतिसाद देत खानापूर तालुक्याच्या विकासासाठी आवश्यक निधी आणि प्रशासकीय मंजुरी देण्याचे आश्वासन दिल्याची माहिती देण्यात आली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.