belgaum

प्रभाताई देशपांडे स्कूल,एमव्हीएम शाळेचे नामकरण

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : “स्वप्ने पाहा आणि ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी सचोटीने व जिद्दीने वाटचाल करा,” असा प्रेरणादायी संदेश हजारो विद्यार्थ्यांना देणाऱ्या प्रभाताई देशपांडे यांचे नाव आज शाळेला देण्यात येणे हा अतिशय आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे, असे प्रतिपादन प्रमुख पाहुण्या डॉ. लीना भोमाज यांनी केले.

महिला विद्या मंडळाच्या एमव्हीएम इंग्लिश मीडियम स्कूलचे नामकरण ‘प्रभाताई देशपांडे स्कूल’ असे करण्यात आले. यानिमित्त आयोजित नामकरण समारंभ गुरुवारी सकाळी उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष भगवानदास कपाडिया होते.

विद्यार्थिनींच्या स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. संस्थेचे चेअरमन अॅड. सचिन बिच्चू यांनी प्रास्ताविकात प्रभाताई देशपांडे यांच्या कार्याचा गौरव करताना, “काही व्यक्ती आपल्या कार्याचा अमिट ठसा समाजावर उमटवतात आणि अनेकांचे आयुष्य घडवतात. प्रभाताई त्यापैकीच एक होत्या,” असे सांगितले.

 belgaum

संस्थेचे उपाध्यक्ष व माजी विद्यार्थी अॅड. विवेक कुलकर्णी यांनी संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेतला. शाळेचा ५५ वा वर्धापनदिन आणि प्रभाताईंचा ९५ वा जन्मदिन यांचे औचित्य साधून शाळेचे नामकरण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. प्रभाताईंनी विद्यार्थ्यांमध्ये रुजवलेली शिस्त, प्रामाणिकपणा आणि जीवनमूल्ये यांची आठवण करून देत, “शाळेच्या नामकरणाचे अनेक वर्षांचे स्वप्न आज पूर्ण झाले,” असे ते म्हणाले.

प्रभाताईंचे पुतणे रोहित देशपांडे यांनीही आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “प्रभाताई अत्यंत शिस्तप्रिय होत्या, मात्र त्यांचे मन तितकेच संवेदनशील होते. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य शाळा आणि विद्यार्थ्यांसाठी समर्पित केले. महिला विद्या मंडळाचे हजारो विद्यार्थी आज देश-विदेशात विविध क्षेत्रांत यशस्वीपणे कार्यरत आहेत.”

प्रमुख पाहुण्या डॉ. लीना भोमाज यांनी ४२ वर्षांपूर्वीच्या शालेय आठवणींना उजाळा देत प्रभाताईंच्या कार्याचा गौरव केला. “महिला विद्यालयाने केवळ शिक्षणच दिले नाही, तर भारतीय संस्कृती, नैतिक मूल्ये आणि परंपरांची जोपासना करत विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडवले. प्रभाताईंनी चारित्र्यसंपन्न आणि जबाबदार पिढी निर्माण करण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले,” असे त्या म्हणाल्या.

यावेळी सचिव राहुल फडके, ट्रस्टी अशोक पोतदार, अजित शानभाग, मधुकर परांजपे, संजीव अध्यापक, शोभा शानभाग, विजय आजगावकर, सागर पाटणेकर, प्रिया खटाव, डॉ. संजय पोरवाल, वैशाली केळुसकर, विवेक तिनईकर, मुख्याध्यापिका कविता परमाणिक यांच्यासह अनेक मान्यवर, माजी विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. तसेच शाळेच्या नव्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले. याचवेळी शाळेच्या नवीन बसचे आणि संस्थेच्या नूतनीकरण केलेल्या अद्ययावत कार्यालयाचे उद्घाटनही करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.