belgaum

बेळगाव मराठा सेंटर येथे डीएससी भरती मेळावा यशस्वीरित्या पार

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगाव येथील मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर येथे आयोजित रेजिमेंटच्या माजी सैनिकांसाठीचा ‘डिफेन्स सिक्युरिटी कॉर्प्स’ (डीएससी) भरती मेळावा नुकताच यशस्वीरित्या पार पडला.

बेळगाव मराठा सेंटर येथे गेल्या 15 व 16 जून रोजी झालेल्या या मेळाव्यामुळे माजी सैनिकांना ‘डिफेन्स सिक्युरिटी कॉर्प्स’मध्ये पुन्हा भरती होऊन देशाची सेवा पुढे सुरू ठेवण्याची संधी मिळाली. विहित पात्रता निकष आणि कार्यपद्धतीनुसार ही भरती प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली.

मेळाव्याद्वारे निवडलेल्या उमेदवारांना कन्नूर येथील डीएससी केंद्रावर चार आठवड्यांचे प्रशिक्षण आणि निर्देशन (ओरिएंटेशन) दिले जाईल. प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर त्यांची नियुक्ती देशभरातील सशस्त्र दलांच्या विविध स्थिर आस्थापनांमध्ये (स्टॅटिक एस्टॅब्लिशमेंट्स) केली जाणार असून प्रत्येक ठिकाणी त्यांचा सेवा कार्यकाळ दोन वर्षांचा असणार आहे.

 belgaum

डीएससीमध्ये पुन्हा भरती झाल्यामुळे माजी सैनिकांना अनेक फायदे मिळतात; त्यामध्ये सुधारित आर्थिक सुरक्षा, करिअरच्या प्रगतीची संधी, पदोन्नती आणि एमएसीपी लाभांसाठी पात्रता, यांचा समावेश असतो. तसेच डीएससी सेवेतून निवृत्त झाल्यावर त्यांना दुहेरी पेन्शनचा लाभ देखील मिळतो.

याव्यतिरिक्त, माजी सैनिकांना स्वतःसाठी आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्यांसाठी वैद्यकीय सुविधा, रजेचे लाभ, प्रवासातील सवलती, निवास आणि रेशन भत्ता, मुलांच्या शिक्षणाचे लाभ, विमा संरक्षण आणि ‘परमनंट कमिशन (स्पेशल लिस्ट)’साठी निवडीसह पुढील प्रगतीच्या संधी यांसारखे सेवाविषयक लाभही मिळत राहतात.

सक्रीय लष्करी सेवेतून निवृत्त झाल्यानंतरही निरंतर सेवा आणि व्यावसायिक प्रगतीसाठी संधी उपलब्ध करून देऊन आपल्या माजी सैनिकांच्या कल्याणासाठी कटिबद्ध राहण्याची मराठा रेजिमेंटची परंपरा यातून दिसून येते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.