बेळगाव लाईव्ह : एका भटक्या कुत्र्याचा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात एका आईला स्वतःचा जीव गमवावा लागल्याची अत्यंत दुर्दैवी घटना गुरुवारी सांबरा गावाजवळ घडली. काही क्षणांपूर्वी मुलासोबत गप्पा मारत प्रवास करणारी आई अचानक काळाच्या पडद्याआड गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
महांतेश कलमठ हे आपल्या आई शांतव्वा कलमठ यांना दुचाकीवरून घेऊन पंतबाळेकुंद्रीहून महांतेश नगरकडे निघाले होते. प्रवास सुरळीत सुरू असतानाच सांबरा गावाजवळ अचानक एक भटके कुत्रे दुचाकीसमोर आले. कुत्र्याला धडक लागू नये म्हणून महांतेश यांनी क्षणाचाही विलंब न करता ब्रेक दाबला.
मात्र या एका क्षणाच्या निर्णयाने आयुष्यच बदलून गेले. अचानक लागलेल्या ब्रेकमुळे पाठीमागे बसलेल्या शांतव्वा यांचा तोल गेला आणि त्या रस्त्यावर आदळल्या. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

आईला वाचवण्यासाठी धडपडणाऱ्या मुलाच्या डोळ्यांसमोरच हा सारा प्रसंग घडला. काही क्षणांपूर्वी आईशी सुरू असलेला संवाद कायमचा थांबला आणि कलमठ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.
या घटनेने रस्त्यावरील भटक्या प्राण्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. एका निष्पाप जीवाला वाचवण्याचा प्रयत्न करताना दुसरा जीव गमवावा लागल्याने ही घटना अनेकांच्या मनाला चटका लावणारी ठरली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मारीहाळ पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
मानवी संवेदनांना स्पर्श करणारी ही घटना एका क्षणातील निर्णय किती मोठी शोकांतिका ठरू शकते, याची वेदनादायी आठवण करून देते.




