बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल आणि सवदत्ती तालुक्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरून मोठे नुकसान झाल्याच्या प्रकरणाची कर्नाटक उपलोकायुक्तांनी गंभीर दखल घेतली आहे.
आपत्ती व्यवस्थापनातील निष्काळजीपणा आणि कर्तव्यातील कसूर याप्रकरणी उपलोकायुक्त न्यायमूर्ती बी. वीरप्पा यांनी सहा जबाबदार अधिकाऱ्यांविरुद्ध स्वतःहून (सुमोटो) गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
बैलहोंगल तालुक्यात नेहमीच्या ५४ मिमीच्या तुलनेत ९७.०४ मिमी इतका विक्रमी पाऊस झाला. यामुळे हवालदार गल्ली, कलमठ गल्ली आणि चन्नम्मा समाधी रोड परिसरातील अनेक घरांचे मोठे नुकसान झाले असून अन्नधान्य, कपडे तसेच इतर साहित्य वाहून गेले. पहिल्याच पावसात दुचाकी वाहून गेल्याची दृश्ये समोर आली होती. संतप्त नागरिकांनी पालिकेच्या ढिसाळ कारभाराविरोधात आंदोलनही केले होते. दरम्यान, सवदत्ती येथील प्रसिद्ध यल्लम्मा मंदिर परिसरातही पूरस्थिती निर्माण झाली होती.

लोकायुक्त पोलीस उपअधीक्षक बी. एस. पाटील यांनी १० जून २०२६ रोजी सादर केलेल्या प्रत्यक्ष पाहणी अहवालानंतर ही कारवाई करण्यात आली. उपलोकायुक्तांनी आपल्या आदेशात नमूद केले आहे की, भारतीय संविधानाच्या कलम २१ अंतर्गत नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरणात जगण्याचा अधिकार आहे आणि प्रशासकीय निष्काळजीपणामुळे हा अधिकार बाधित झाला आहे.
या प्रकरणी बैलहोंगलचे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी, पालिकेचे मुख्याधिकारी, महसूल निरीक्षक आणि ग्राम प्रशासकीय अधिकारी (VA) यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. संबंधित अधिकाऱ्यांना २७ जुलै २०२६ रोजी पुराव्यांसह प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश देण्यात आले असून, बेळगावचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना या प्रकरणावर देखरेख ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.




