belgaum

बेळगावात ‘नीट’ परीक्षेसाठी २८ केंद्रांवर जमाबंदी आदेश लागू

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे (NTA) आयोजित ‘री-नीट यूजी’ (RE-NEET UG) परीक्षा शांततापूर्ण आणि सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी बेळगाव शहरातील २८ परीक्षा केंद्रांच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. २१ जून २०२६ रोजी दुपारी २:०० ते सायंकाळी ५:१५ या परीक्षा कालावधीत केंद्रांच्या भोवती २०० मीटरच्या व्याप्तीमध्ये ही जमाबंदी लागू असेल.

बेळगाव शहराचे अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी तथा पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम १६३ अन्वये हे आदेश दिले आहेत. परीक्षेदरम्यान कोणताही गैरप्रकार होऊ नये आणि कायदा-सुव्यवस्था राखली जावी, यासाठी परीक्षा केंद्रांच्या आवारात ५ किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे.

यादीत संगोळ्ळी रायण्णा कॉलेज, केएलई सोसायटीची कॉलेजेस, शासकीय तंत्रनिकेतन , व्हीटीयू मच्छे येथील ४ वेगळे ब्लॉक्स, आरपीडी कॉलेज, ज्योती कॉलेज, तसेच केंद्रीय विद्यालय १, २ आणि ३ यांसह बेळगाव शहरातील इतर प्रमुख शाळा आणि महाविद्यालयांचा समावेश आहे.

 belgaum

या आदेशानुसार, परीक्षा केंद्रांच्या २०० मीटर परिसरात ध्वनिक्षेपक वापरण्यास पूर्णपणे बंदी असेल. तसेच या क्षेत्रातील सर्व सायबर कॅफे, झेरॉक्स दुकाने आणि इंटरनेट केंद्रे परीक्षा संपेपर्यंत सक्तीने बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

परीक्षा कर्मचारी आणि संबंधित अधिकाऱ्यांव्यतिरिक्त इतर नागरिक किंवा पालकांना या परिसरात प्रवेश दिला जाणार नाही. याशिवाय परीक्षा केंद्रांच्या आवारात शस्त्रे, लाठ्या-काठ्या, दगड किंवा कोणत्याही प्रकारचे स्फोटक आणि आक्षेपार्ह साहित्य बाळगण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

या प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २२३ नुसार कडक कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश पोलीस प्रशासनाला देण्यात आले आहेत. परीक्षा शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस उपायुक्त आणि संबंधित पोलीस ठाण्यांच्या निरीक्षकांना चोख बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.