बेळगाव लाईव्ह : बेळगाव महानगरपालिकेकडून एकीकडे कचरा व्यवस्थापनासाठी विविध उपक्रम आणि स्वच्छतेचे धडे दिले जात असताना, दुसरीकडे प्रशासकीय पातळीवरील ढिसाळ कारभारामुळे कंग्राळी खुर्द येथील मुख्य रस्ता कचरा डेपो बनला आहे. महानगरपालिका आणि ग्रामपंचायत यांच्यातील हद्दीच्या वादामुळे गेल्या महिनाभरापासून रस्त्यावरच कचरा सडत असल्याने स्थानिक नागरिकांनी तीव्र आंदोलन केले.
महानगरपालिका सध्या शहर स्वच्छतेसाठी विविध मोहिमा राबवत असल्याचा दावा करत आहे. मात्र, शहराच्या वेशीवर असलेल्या कंग्राळी खुर्द परिसरात पालिका आणि पंचायतीच्या अधिकाऱ्यांमध्ये केवळ जबाबदारी ढकलण्याची चढाओढ सुरू आहे. या प्रशासकीय त्रुटींमुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असून, लहान मुले आणि वृद्धांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर आज स्थानिक रिक्षाचालक आणि नागरिकांनी एकत्र येत आंदोलन छेडले. महानगरपालिका आणि ग्रामपंचायत यांच्यातील हद्दीच्या वादामुळे गेल्या महिनाभरापासून रस्त्यावरच कचरा सडत असल्याने रिक्षाचालकांना तेथून ये-जा करणे आणि प्रवाशांची ने-आण करणे कठीण झाले आहे.

या कचराकोंडीमुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असून, वारंवार तक्रार करूनही दोन्ही संस्था जबाबदारी झटकत असल्याचा आरोप करत संतप्त रिक्षाचालकांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा तीव्र निषेध केला.
अधिकारी केवळ बैठका आणि नियमांचे दाखले देण्यात व्यस्त असून प्रत्यक्ष कामात दिरंगाई होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. रस्त्यावरील कचऱ्यामुळे नुकतीच एक अपघाती घटनाही घडली आहे. प्रशासनाने या दोन्ही संस्थांमधील वाद मिटवून तातडीने कचरा न हटवल्यास आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा ग्रा मस्थांनी दिला आहे.




