बेळगाव लाईव्ह :मुतगा विस्तारित प्रदेशातील नागरिकांनी मूलभूत नागरी सुविधांच्या अभावाविरोधात बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालय गाठत प्रशासनाकडे न्यायाची मागणी केली. रस्ते, पिण्याचे पाणी, गटारी आणि स्वच्छता यांसारख्या अत्यावश्यक सुविधांची तातडीने पूर्तता करावी, अन्यथा 15 दिवसांनंतर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा रहिवाशांनी दिला आहे.
मुतगा एक्सटेन्शन आणि निलजी ग्रामपंचायत हद्दीतील गोकुळनगर, श्रीरामनगर, साईनगर आणि विनायकनगर परिसरातील रहिवाशांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकांनी निवेदन स्वीकारून मागण्यांचा सकारात्मक विचार करून योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले.
रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, आर.एस. नं. 262/5 भरमगौड पाटील लेआऊटसह साईनगर सातवा आणि आठवा क्रॉस परिसरात रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. सर्वत्र खड्डे पडल्याने नागरिकांना रोजच्या प्रवासात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात परिस्थिती अधिक गंभीर बनली असून अनेक ठिकाणी रस्ते चिखलमय झाले आहेत.
याशिवाय परिसरात पिण्याच्या पाण्याची नियमित व्यवस्था नसल्याने नागरिक त्रस्त आहेत. गटारींचा अभाव आणि स्वच्छतेकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे अस्वच्छता वाढली असून ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. वारंवार तक्रारी करूनही संबंधित विभागांकडून केवळ आश्वासनांचीच खैरात मिळत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला.
साईनगर येथील रहिवासी विनोद कुलकर्णी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “गेली अनेक वर्षे आमच्या भागात मूलभूत सुविधांची वानवा आहे. रस्ते नाहीत, कचरा उचलला जात नाही, पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही. ग्रामपंचायतीला आमच्या भागातून मोठ्या प्रमाणात महसूल मिळत असतानाही विकासकामांकडे दुर्लक्ष केले जात आहे. जलजीवन मिशनअंतर्गत नळजोडण्या दिल्या असल्या तरी बहुतांश घरांमध्ये पाणीच येत नाही. त्यामुळे ही योजना आमच्या भागात पूर्णपणे अपयशी ठरली आहे.”

“दोन महिन्यांपासून घरगुती कचरा संकलनही बंद आहे. त्यामुळे परिसरात अस्वच्छता वाढून रोगराईचा धोका निर्माण झाला आहे. आमच्या मागण्यांची येत्या 15 दिवसांत पूर्तता झाली नाही, तर आम्ही उग्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारू,” असा इशाराही त्यांनी दिला.
नागरिकांच्या या आक्रमक भूमिकेमुळे मुतगा विस्तारित प्रदेशातील नागरी सुविधांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून प्रशासन याकडे कितपत गांभीर्याने पाहते, याकडे आता परिसरातील रहिवाशांचे लक्ष लागले आहे.




