बेळगावच्या आघाडीच्या महिला शरीरसौष्ठवपटू केतकी पाटील यांनी लुधियाना, पंजाब येथे नुकत्याच पार पडलेल्या 15 व्या फेडरेशन कप बॉडीबिल्डिंग अँड फिजिक स्पोर्ट्स चॅम्पियनशिप -2026 या प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय पातळीवरील शरीरसौष्ठव स्पर्धेतील महिलांच्या क्रीडा सौष्ठव (वुमन्स स्पोर्ट्स फिजिक) विभागात तृतीय क्रमांकासह कांस्य पदक पटकावले आहे.
इंडियन बॉडी बिल्डर्स फेडरेशनच्या (आयबीबीएफ) मान्यतेने पंजाब हौशी शरीरसौष्ठव संघटनेतर्फे गेल्या 12 व 13 जून 2026 रोजी लुधियाना, पंजाब येथे 15 व्या मेन्स बॉडी बिल्डिंग अँड स्पोर्ट्स फिजिक, वुमन्स मॉडेल फिजिक अँड स्पोर्ट्स फिजिक बॉडीबिल्डिंग चॅम्पियनशिप -2026 चे यशस्वी आयोजन करण्यात आले.
पुरुष व महिलांसाठी असलेल्या या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत देशातील मातब्बर स्त्री -पुरुष शरीरसौष्ठवपटुंनी सहभाग दर्शवला होता. त्यामध्ये कर्नाटक राज्याचे प्रतिनिधित्व करताना वुमन्स स्पोर्ट्स फिजिक विभागात बेळगावच्या केतकी पाटील यांनी तृतीय क्रमांकासह कांस्य पदक मिळविले.
या विभागात आयबीबीएफच्या खुशबू यादव आणि केरळच्या भूमिका कुमार यांनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्य पदक पटकावले. बेळगावच्या केतकी पाटील यांनी यापूर्वी विविध राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी नोंदवली असून प्रतिष्ठेच्या फेडरेशन कप स्पर्धेतील उपरोक्त यशाबद्दल त्यांचे शरीरसौष्ठव क्षेत्रासह सर्वत्र अभिनंदन होत आहे.




