बेळगाव लाईव्ह : बेळगावमधील मराठी भाषिकांवर कर्नाटक प्रशासनाकडून सातत्याने होणाऱ्या अन्यायाविरोधात आणि सीमाप्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने पुकारलेला २२ तारखेचा महामोर्चा कोणत्याही परिस्थितीत काढण्याचा ठाम निर्धार आज झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत करण्यात आला.
बेळगावचे जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाने कितीही दबाव आणला, अगदी अटक करण्याची कारवाई केली, तरी नियोजित मोर्चा काढणारच आणि तो यशस्वी करून दाखवणार, असा आक्रमक पवित्रा समितीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी एकमताने घेतला आहे. कालच जिल्हाधिकाऱ्यांनी समितीच्या नेत्यांची बैठक घेऊन कायदा व सुव्यवस्थेचे कारण पुढे करत मोर्चा काढू नका, अशा सूचना दिल्या होत्या. मात्र, प्रशासनाची ही दडपशाही झुगारून देत सीमाभागातील मराठी जनतेचा आवाज बुलंद करण्याचा निर्णय समितीने घेतला असून, यामुळे बेळगावमधील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे.
या बैठकीमध्ये केवळ नेत्यांनीच नव्हे, तर उपस्थित कार्यकर्त्यांनीही अत्यंत आक्रमकपणे आपली मते मांडली. अनेक कार्यकर्त्यांनी प्रशासनाच्या दडपशाहीवर तीव्र संताप व्यक्त केला. “प्रशासन कितीही प्रयत्न करो, आता मागे हटायचे नाही. हवी तर अटक पत्करू, लाठ्या-काठ्या खाऊ, पण सीमावासीयांचा हा हक्क आणि अस्मितेची लढाई थांबणार नाही,” अशा भावना कार्यकर्त्यांनी हिरीरीने मांडल्या. कार्यकर्त्यांच्या या अभूतपूर्व उत्साहामुळे आणि पाठिंब्यामुळे बैठकीत मोर्चा अधिक व्यापक करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीत केवळ बेळगावमधील मोर्चाच नव्हे, तर दिल्लीतील वरिष्ठ पातळीवर सीमाप्रश्नाची धग पोहोचवण्यासाठी एक मोठी रणनीती आखण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे लवकरच कोल्हापूर दौऱ्यावर येत असून, तिथे त्यांची मोठी जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती म. ए. समितीचे शेकडो कार्यकर्ते थेट कोल्हापूरला धडकणार आहेत. कोल्हापुरात जाऊन अमित शहा यांची भेट घेऊन त्यांना सीमाप्रश्नाचे निवेदन देण्याचा समितीचा प्रयत्न असेल. परंतु, जर प्रशासनाने किंवा पोलिसांनी ही भेट नाकारली, तर थेट अमित शहा यांच्या जाहीर सभेत घुसून जोरदार घोषणाबाजी करण्याचा आणि आंदोलन छेडण्याचा इशारा समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनी दिला आहे.

या संपूर्ण आंदोलनाच्या नियोजनासाठी समितीचे नेतृत्व सध्या महाराष्ट्रातील प्रमुख मंत्री आणि कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात आहे. कोल्हापूर पोलीस खात्याकडून अमित शहा यांच्या कार्यक्रमाचे अंतिम नियोजन उद्यापर्यंत स्पष्ट होईल. त्यानंतर, समितीचे कार्यकर्ते कोल्हापुरात नक्की कुठे जमणार, किती वाजता पोहोचणार आणि आंदोलनाची पुढील दिशा काय असेल, हे उद्या पत्रकार परिषद घेऊन सर्व माध्यमांना जाहीर केले जाईल.
या आंदोलनासाठी २० तारखेलाच बेळगावातून कार्यकर्ते कोल्हापूरकडे कूच करणार आहेत. बैठकीला समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांच्यासह माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, रणजित चव्हाण पाटील, आबासाहेब दळवी, लक्ष्मण होनगेकर, बी. डी. मोहनगेकर, गोपाळ देसाई, अमर येळ्ळूरकर आणि मुरलीधर पाटील यांसह अनेक आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




