बेळगाव लाईव्ह :वाहतूक नियमभंगासाठी ई-चलानच्या स्वरूपात वाहनचालकांना ठोठावण्यात आलेल्या, मात्र अद्याप प्रलंबित असलेल्या दंडामध्ये 50 टक्के सवलत देण्याचा आदेश कर्नाटक सरकारने जारी केला आहे. प्रलंबित दंड वसुलीसाठी जाहीर करण्यात आलेली ही सवलत 21 जून ते 10 जुलै 2026 या कालावधीत लागू राहणार असून, संबंधित वाहनचालकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन बेळगाव शहराचे पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी केले आहे.
वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी बेळगावसह राज्यभरातील वाहनचालकांना ई-चलानच्या माध्यमातून दंड ठोठावण्यात आला आहे. मात्र, त्यापैकी मोठ्या संख्येने वाहनचालकांनी अद्याप हा दंड भरलेला नाही. वाहनचालकांची सोय तसेच महसूलवाढ लक्षात घेऊन राज्य सरकारने एका आदेशाद्वारे प्रलंबित ई-चलान दंडावर 50 टक्के सवलत जाहीर केली आहे. यापूर्वीही सरकारने वेळोवेळी अशा प्रकारची सवलत दिली होती.
प्रलंबित ई-चलान दंड वसुलीसाठीची ही विशेष सवलत 21 जून ते 10 जुलै 2026 या 20 दिवसांच्या कालावधीत लागू असणार आहे. त्यामुळे संबंधित वाहनचालकांनी या कालावधीत आपला प्रलंबित दंड भरून या सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी केले आहे.
वाहनचालकांना आपला प्रलंबित दंड जवळच्या वाहतूक पोलीस ठाण्यात, पोलीस आयुक्तालयाच्या स्वागत कक्षात अथवा कर्नाटक वन/बेळगाव वन केंद्रांमध्ये भरता येणार आहे. बेळगाव शहरात अशोकनगर, दूरदर्शननगर (टीव्ही सेंटर), रिसालदार गल्ली (जुनी महापालिका इमारत) आणि गोवावेस येथे कर्नाटक वन/बेळगाव वन केंद्रे कार्यरत आहेत.
याशिवाय, सहाय्यक पोलीस निरीक्षक व त्यावरील दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांकडेही ई-चलानचा दंड भरता येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.




