बेळगाव लाईव्ह: श्रीक्षेत्र दक्षिणकाशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेळगावमधील जागृत देवस्थान ‘कपिलेश्वर मंदिर’ प्रशासनाने भाविकांसाठी नवीन वस्त्रसंहिता (ड्रेसकोड) लागू केली आहे. मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आता केवळ पारंपरिक पोशाखातच प्रवेश दिला जाणार असून, पाश्चात्त्य किंवा तोकड्या कपड्यांवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
काय आहेत नवीन नियम?
मंदिर समितीने मुख्य प्रवेशद्वारावर याबाबतचे फलक लावले आहेत. नवीन नियमांनुसार:
पुरुष भाविक: हाफ पॅंट किंवा तत्सम तोकडे कपडे घालून प्रवेश करता येणार नाही.
महिला भाविक: गाऊन किंवा तोकडे फॅन्सी कपडे घालून दर्शनास मनाई आहे. साडी किंवा पारंपरिक पेहराव अनिवार्य असून, इतर पेहराव असल्यास ‘दुपट्टा’ घेणे आवश्यक आहे.
रील्सवर बंदी: मंदिर परिसरात पाश्चात्त्य कपडे घालून रील्स बनवणाऱ्यांवरही आता निर्बंध घालण्यात आले आहेत.
निर्णयामागची पार्श्वभूमी
मंदिरात दररोज हजारो भाविक येतात, तर सोमवारी आणि महाशिवरात्रीसारख्या सणांच्या दिवशी ही गर्दी लाखोंच्या घरात असते. मात्र, गोवा किंवा इतर पर्यटन स्थळांहून परतणारे पर्यटक तसेच स्थानिक भाविक अयोग्य पेहरावात येत असल्याने मंदिराच्या पावित्र्याला बाधा येत असल्याचे दिसून आले होते. या प्रकारांना आळा घालण्यासाठी १ एप्रिलपासून प्रायोगिक तत्त्वावर ही वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे.
काय म्हणाले मंदिर प्रशासनाचे प्रतिनिधी?
या निर्णयाबाबत बोलताना मंदिराचे मुख्य पुजारी नागराज कट्टी यांनी सांगितले की, “मंदिराचे पावित्र्य राखणे ही सर्वांची जबाबदारी आहे. वाढता अयोग्य पेहराव आणि रील्स बनवण्याचे प्रकार थांबवण्यासाठी आम्ही हे पाऊल उचलले आहे.”

तर यावर मंदिर समितीचे अभिजीत चव्हाण यांनी अधिक स्पष्टीकरण देताना सांगितले की, “आम्ही भाविकांच्या श्रद्धेचा आदर करतो, परंतु मंदिराचे एक आध्यात्मिक वातावरण असते. पर्यटन स्थळांवरून येताना भाविकांनी आपल्या कपड्यांबाबत भान राखणे गरजेचे आहे. ज्यांना हे नियम पाळणे शक्य नाही, त्यांना दर्शनासाठी प्रवेश दिला जाणार नाही. हा निर्णय भाविकांच्या भावना आणि मंदिर प्रशासनाच्या नियमांचे पालन व्हावे, याच उद्देशाने घेण्यात आला आहे.”
मंदिरात येणाऱ्या भाविकांनी या नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मंदिर समितीकडून करण्यात आले आहे.




