belgaum

सीमाप्रश्न सुटेपर्यंत गप्प बसणार नाही; निर्णायक लढ्यासाठी आवाहन

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : सीमाप्रश्न सुटेपर्यंत मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती गप्प बसणार नाही. लोकशाही मार्गाने शक्य तितकी आंदोलने करून मराठी भाषिकांच्या न्याय्य हक्कांसाठी लढा सुरूच राहील, अशी ठाम भूमिका मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनी व्यक्त केली. १ जून १९८६ च्या कन्नड सक्तीविरोधी आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी सोमवारी हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

सालाबादप्रमाणे बेळगाव मध्यवर्ती, शहर आणि तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने कन्नड सक्तीविरोधी आंदोलनातील हुतात्म्यांना गांभीर्याने अभिवादन करण्यात आले. हुतात्म्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ न देता सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी एकजुटीने आणि संपूर्ण ताकदीनिशी निर्णायक लढा देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

कार्यक्रमास मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे, सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर, बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष तथा माजी आमदार मनोहर किणेकर, शहर समितीचे अध्यक्ष रणजीत चव्हाण-पाटील, खानापूरचे माजी आमदार दिगंबर पाटील, माजी महापौर सरिता पाटील, माजी उपमहापौर रेणू किल्लेकर, आर. एम. चौगुले, सरस्वती पाटील, रवी साळुंके, आर. आय. पाटील, प्रकाश शिरोळकर यांच्यासह समिती, शिवसेना कार्यकर्ते आणि मराठी भाषिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 belgaum

यावेळी हुतात्म्यांच्या प्रतिमांना पुष्पहार आणि पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच “बेळगाव, खानापूर, निपाणी, बिदर-भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे” आणि कन्नड सक्तीविरोधी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

आपल्या भाषणात प्रकाश मरगाळे यांनी सरकारी कार्यालये आणि सार्वजनिक नामफलकांवर ६० टक्के कन्नडबरोबर ४० टक्के इतर भाषांमध्ये मराठीला प्राधान्य देऊन त्याची अंमलबजावणी २२ जूनपर्यंत करावी, अशी मागणी करणारे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात येणार असल्याचे सांगितले. सीमाप्रश्न न्यायप्रविष्ट असल्याने सीमाभागात कन्नड सक्ती करू नये, अशी समितीची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

याशिवाय, सीमाभागातील मराठी भाषिकांच्या प्रश्नांबाबत महाराष्ट्रातील खासदारांची दिल्लीत भेट घेऊन लोकसभेत हा मुद्दा उपस्थित करण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. २२ जूनपर्यंत मराठी भाषेची अंमलबजावणी झाली नाही, तर जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्याचा इशाराही त्यांनी दिला.

माजी आमदार मनोहर किणेकर यांनी कन्नड सक्तीविरोधी आंदोलनातील नऊ हुतात्म्यांच्या बलिदानाची आठवण करून देत, सीमाप्रश्नाची सोडवणूक हाच कन्नड सक्तीला कायमचा पर्याय असल्याचे सांगितले. सरकारी आणि सार्वजनिक नामफलकांवरील मराठी भाषेच्या अंमलबजावणीसाठी २२ जून रोजी भव्य मोर्चा काढण्यात येणार असून, त्यासाठी मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

खानापूरचे माजी आमदार दिगंबर पाटील यांच्यासह अन्य मान्यवरांनीही आपले विचार व्यक्त करताना, हुतात्म्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ न देता सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी मराठी भाषिकांनी एकजुटीने लढा देण्याचे आवाहन केले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.