belgaum

हुतात्मा दिन गांभीर्याने पाळण्याचा निर्धार;

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : १ जून १९८६ रोजी कन्नड सक्तीविरोधी आंदोलनात हुतात्मा झालेल्या वीरांना आदरांजली अर्पण करण्यासाठी सीमा भागातील मराठी जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत करण्यात आले. समिती नेते पिराजी मुचंडीकर यांच्या अध्यक्षतेखाली गोवावेस येथील रामलिंगवाडीतील श्री गणेश मंदिरात ही बैठक पार पडली.

बैठकीत ज्येष्ठ साहित्यिक तथा महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते गुणवंत पाटील यांनी सीमा प्रश्नाबरोबरच शहरातील नागरी समस्यांवरही ठाम भूमिका घेण्याची गरज व्यक्त केली. सीमा प्रश्नासाठी आंदोलन करण्याची तयारी असेल, तर शहरातील मूलभूत प्रश्नांसाठीही लोकप्रतिनिधींना जाब विचारला पाहिजे, असे ते म्हणाले.


कार्यकर्त्यांना सक्रिय करण्यासाठी केवळ बैठका घेऊन चालणार नाही, तर समितीने तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचले पाहिजे, असे मत समितीने नेते रणजीत चव्हाण पाटील यांनी व्यक्त केले. नेते आणि कार्यकर्ते यांच्यातील दरी कमी करून संघटनात्मक बळकटीसाठी अधिक प्रभावीपणे काम करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.

 belgaum

रणजित हावळाण्याचे यांनी कर्नाटक सरकारच्या फलक धोरणावर टीका करताना मराठी भाषेला अन्यायकारक वागणूक दिली जात असल्याचा आरोप केला. ६० टक्के आणि ४० टक्के भाषिक नियम अस्तित्वात असतानाही दुकानांवरील फलकांवरून मराठी भाषा हटविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा दावा करत त्यांनी त्याचा निषेध केला.

युवा कार्यकर्ते सागर पाटील यांनी नवीन पिढीला सीमा प्रश्न आणि मराठी भाषिकांच्या समस्यांशी जोडण्यासाठी हुतात्मा दिनासह समितीचे विविध उपक्रम युवकांपर्यंत पोहोचविण्याची गरज व्यक्त केली. अभिजित मजूकर यांनी शहर समितीच्या अध्यक्षपदासाठी तळागाळात काम केलेल्या कार्यकर्त्यालाच संधी देण्यात यावी, अशी मागणी केली.

अनिल आमरोळे यांनी समितीच्या बैठकीबाबत होत असलेल्या गैरसमजांना उत्तर देताना, आपण मूळ महाराष्ट्र एकीकरण समितीशी निष्ठावंत असल्याचे स्पष्ट केले. कार्यकर्त्यांनी एकजुटीने आणि जबाबदारीने काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

प्रशांत भातखंडे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत बेळगाव दक्षिण मतदारसंघातून रमाकांत कोंडुस्कर हेच उमेदवार असतील, असा विश्वास व्यक्त करत त्यांच्या प्रचारासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले.

बैठकीत माजी नगरसेवक राजू बिर्जे, संजय शिंदे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी मनोगते व्यक्त केली. सुनील बोकडे यांनी प्रास्ताविक केले, तर महादेव पाटील यांनी आभार मानले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.