:बेळगाव लाईव्ह :रत्नागिरीकुणबी समाज, बेळगावच्यावतीने आयोजित 19 वे वार्षिक स्नेहसंमेलन व कुणबी समाजातील गरीब व होतकरू विद्यार्थी – विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्य वाटप असा संयुक्त कार्यक्रम आज महाराष्ट्राचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदयजी सामंत यांच्या खास उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला.
बेळगाव मधील रत्नागिरी कुणबी समाजाचे अध्यक्ष सुधीर घडशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या वरील कार्यक्रमात प्रमुख पाहुणे या नात्याने बोलताना मंत्री उदय सावंत यांनी समयोचित विचार व्यक्त केले ग्रामीण भागातील. गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी आणि त्यांच्या पंखांना बळ देण्यासाठी कुणबी समाजाने राबवलेला हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे.
समाजातील शेवटच्या घटकातील मुला-मुलींपर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचावी, यासाठी महाराष्ट्र शासन आणि समाज म्हणून आम्ही नेहमीच कटिबद्ध आहोत असे स्पष्ट करून उपस्थित सर्व विद्यार्थी -विद्यार्थिंनींना त्यांच्या उज्ज्वल शैक्षणिक भविष्यासाठी मंत्री उदय सावंत यांनी शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमादरम्यान त्यांनी समाजबांधव व गुणवंत विद्यार्थी -विद्यार्थिंनींशी संवादही साधला.
यावेळी कुणबी समाज बेळगावचे अध्यक्ष सुधीर घडशी यांच्यासह उपाध्यक्ष गणपत सुवारे, भाजपाच्या सरचिटणीस श्रीमंत राणीसरकार सौ. धनश्री पद्मसिंह सरदेसाई, रामभाऊ गराटे, महिला मंडळ अध्यक्षा गायत्रीताई गोणबरे, उपाध्यक्ष ज्योतीताई माईन, श्रीकांत मांडवकर, गजानन नागले, प्रकाश परापते, विनायक शिवगण, महादेव सुवारे, तात्या सावंत यांच्यासह समाज बांधव, गुणवंत विद्यार्थी – विद्यार्थिंनी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्र एकीकरणतर्फे मंत्री उदय सावंत यांचा हृद्य सत्कार
महाराष्ट्र एकीकरण समिती बेळगावच्यावतीने महाराष्ट्राचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदयजी सामंत यांचा आज हृद्य सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्राचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदयजी सामंत आज बेळगाव दौऱ्यावर आले असता उपरोक्त सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. सत्काराला उत्तर देताना मंत्री सावंत यांनी, सीमाभागातील मराठी अस्मिता आणि संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने अविरतपणे दिलेला लढा आणि केलेले कार्य सर्वांसाठी सदैव प्रेरणादायी आहे.
हा सत्कार म्हणजे केवळ माझा सन्मान नसून, महाराष्ट्र आणि सीमाभागातील मराठी भाषिकांमधील घट्ट नाते अधोरेखित करणारा क्षण आहे असे नमूद करून सीमाभागातील मराठी माणसाची अस्मिता आणि बंधुभाव अधिक दृढ करण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत, असे यावेळी मंत्री उदयजी सामंत यांनी स्पष्ट केले.




