belgaum

मंत्री सावंत यांच्याकडून मुख्यमंत्र्यांशी बैठक घडवून आणण्याची ग्वाही -अष्टेकर

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह :सर्वोच्च न्यायालयातील सीमाप्रश्नाच्या दाव्याची सुनावणी लवकरात लवकर व्हावी यासंदर्भात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांची बैठक घडवून आणण्याची ग्वाही महाराष्ट्राचे मराठी भाषा मंत्री उदय सावंत यांनी दिली आहे, अशी माहिती मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर यांनी दिली.

महाराष्ट्राचे मराठी भाषा मंत्री उदय सावंत यांची आज रविवारी सकाळी भेट घेतल्यानंतर ते प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होते. अष्टेकर यांनी सांगितले की, बेळगाव भेटीवर आलेले महाराष्ट्राचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची आज महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकारी व सदस्यांनी भेट घेतली. त्यावेळी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनी सर्वोच्च न्यायालयातील सीमाप्रश्नाच्या दाव्या संदर्भातील तपशीलवार माहिती त्यांना देऊन या दाव्याची सुनावणी लवकरात लवकर सुरू व्हावी यासाठी महाराष्ट्र सरकारने प्रयत्न करावेत, अशी विनंती त्यांना केली.

यासंदर्भात महाराष्ट्र सरकारकडून होत असलेली दिरंगाई उच्च अधिकार समितीची बैठक या संदर्भात येथील मराठी भाषिकांच्या भावना याविषयीची जाणीव मरगाळे यांनी मंत्र्यांना करून दिली. तेंव्हा मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधून लवकरात लवकर यासंदर्भात बैठक आयोजित करून त्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना बोलवण्यात येईल, अशी ग्वाही मंत्री सावंत यांनी दिली आहे.

 belgaum

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आंदोलनासंदर्भात बोलताना आंदोलनाची गरज भासणार नाही कारण योग्य तो क्रम घेऊन आपण निश्चितपणे सीमाभागातील मराठी जनतेला मदत करू असे ठोस आश्वासन मंत्री उदय सावंत यांनी दिले असल्याचे सांगितले. तसेच फटाके उडवताना डोळ्यांना गंभीर इजा झालेला समिती कार्यकर्ता शिवा लोहार याच्यावर उपचार करून त्याला पुन्हा दृष्टी मिळवून देण्याचे मोठं मानवतावादी कार्य करण्यात आले आहे. त्याबद्दल महाराष्ट्र सरकार, शिवसेना नेते एकनाथ शिंदे, त्यांचे सहाय्यक मंगेश चिवटे आणि संबंधित इतरांचे महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर यांनी मनःपूर्वक आभार मानले.

यावेळी बोलताना रमाकांत कोंडुसकर यांनी 5 -6 महिन्यांपूर्वी भारताने वेस्ट इंडिज विरुद्धचा क्रिकेट सामना जिंकल्यानंतर फटाके उडवताना शिवा लोहार हा कार्यकर्ता दोन्ही डोळ्यांना इजा होऊन कशाप्रकारे जखमी झाला याची थोडक्यात माहिती दिली. तसेच त्याच्यावरील उपचारासाठी 7 ते 8 लाख रुपये खर्च येणार होता.

तथापि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील शिवसेनेच्या वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून शिवा लोहार याच्यावर हैदराबाद येथे नि:शुल्क शस्त्रक्रिया करण्यात आली. ज्यामुळे शिवा याच्या एका डोळ्याला दृष्टी प्राप्त होऊन तो आज पाहू शकतो असे सांगून या पार्श्वभूमीवर आज आयपीएल क्रिकेट स्पर्धेतचा अंतिम सामना आहे. त्यामुळे शिवा लोहार याच्यापासून धडा घेऊन आजच्या सामन्यानंतर फटाके उडवून आनंदोत्सव साजरा करताना युवा पिढीने काळजी घ्यावी, असे आवाहन कोंडुसकर यांनी केले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.