belgaum

तर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेणार; समस्या मांडणार : उदय सामंत

0
 belgaum


बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्राचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी रविवारी बेळगाव दौऱ्यात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून सीमाभागातील मराठी भाषिकांच्या विविध समस्या जाणून घेतल्या.

सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या बेळगाव सीमाप्रश्नाच्या खटल्याची लवकर सुनावणी व्हावी आणि यासंदर्भात महाराष्ट्र सरकारने पुढाकार घ्यावा, अशी मागणी समितीच्या शिष्टमंडळाने त्यांच्याकडे केली.


पत्रकार परिषदेत बोलताना उदय सामंत यांनी सांगितले की, महाराष्ट्रात 23 ते 25 जूनदरम्यान विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने तत्काळ बैठक घेणे शक्य नाही. मात्र आचारसंहिता संपल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एक एकनाथ शिंदे यांच्यासोबत महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक घडवून आणण्यासाठी आपण स्वतः समन्वयक म्हणून काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 belgaum

.
समितीने 29 जून रोजी मुंबईतील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. मात्र समितीच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी बैठक घडवून आणण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आल्याचे सामंत यांनी सांगितले. “महाराष्ट्र एकीकरण समितीला मुंबईत आंदोलन करण्याची वेळ येऊ देणार नाही,” असे ठाम आश्वासनही त्यांनी दिले.


सीमाप्रश्नाबाबत बोलताना सामंत म्हणाले की, कर्नाटक सरकारवर टीका करण्यासाठी आपण बेळगावात आलो नसून मराठी भाषिकांच्या अडीअडचणींबाबत संवाद साधण्यासाठी आलो आहोत. मराठी भाषा मंत्री या नात्याने कर्नाटकचे मुख्यमंत्री संबंधित मंत्र्यांची भेट घेऊन सीमाभागातील मराठी भाषिकांच्या समस्या मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच सीमाभागात मराठी भाषिकांवर कन्नड भाषेची सक्ती होऊ नये, अशी विनंती आपण कर्नाटक सरकारकडे करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी कर्नाटक सरकारने दौऱ्यादरम्यान दिलेल्या सुरक्षा व्यवस्थेबद्दल आभार व्यक्त केले. मराठी भाषिकांना न्याय मिळावा आणि त्यांच्या समस्या मार्गी लागाव्यात, हीच आपली भूमिका असल्याचे त्यांनी नमूद केले.


दरम्यान, एका कार्यक्रमाच्या पत्रिकेत बेळगावचा उल्लेख ‘बेळगावी’ असा झाल्याबद्दल उदय सामंत यांनी दिलगिरी व्यक्त केली. तसेच सीमाभागाच्या प्रश्नांबाबत संपर्कासाठी आपण कायम उपलब्ध राहू आणि लवकरच संबंधित मंत्र्यांसह पुन्हा सीमाभागाचा दौरा करू, असे आश्वासन त्यांनी दिले.


 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.