बेळगाव लाईव्ह :जन्म देऊन कष्टाने लहानाचे मोठे केलेल्या आईला वृद्धापकाळात आधार देण्याऐवजी पोटच्या मुलाने तिचे वृद्धापवेतन, गृहलक्ष्मीचे पैसे व दागिने बळकावून तिलाच घराबाहेर काढल्याची संतापजनक घटना रायबाग तालुक्यातील माडलगी येथे घडली.
आईला घराबाहेर काढणाऱ्या निर्दय मुलाचे नांव हालप्पा खांडेकर असे आहे. मुलाच्या वागणुकीमुळे 78 वर्षीय सत्यव्वा खांडेकर हिला हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. संपत्तीच्या हव्यासापोटी हालप्पाने आपली आई सत्यव्वा हिचा मानसिक व शारिरीक छळ केल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांकडून करण्यात येत आहे.
हालप्पा हा आपल्या आईवर तिच्या माहेरच्या संपत्तीतील हिस्सा आणण्यासाठी सतत दबाव टाकत होता. तुझ्या माहेरच्या मालमत्तेतील वाटा मिळवून आण, अशी मागणी हालप्पा वारंवार सत्यव्वाकडे करत होता. तसे करण्यास तिने नकार दिल्याने त्याने आईला मारहाण करून घराबाहेर काढले. मुलाच्या जाचाला कंटाळून सत्यव्वा हिने सध्या चिक्कोडी तालुक्यातील बेळकूड येथील बडेयर यांच्या शेतातील आपल्या माहेरी आश्रय घेतला आहे.

वृद्धापकाळात मुलाकडून आधार मिळण्याऐवजी छळ आणि अपमान सहन करावा लागल्याने तिला मानसिक नैराश्य आले आहे. विशेष म्हणजे हाळप्पा सत्यव्याची वृद्धापवेतन, गृहलक्ष्मी योजनेंतर्गत मिळणारे पैसे स्वतःकडेच ठेवत होता.
या पद्धतीने तिचे उपजीविकेचे साधनही त्याने हिरावून घेतले होते. या घटनेमुळे संतापाची लाट उसळली असून वृद्ध आईला न्याय मिळावा तसेच निर्दयी मुलावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.




