बेळगाव लाईव्ह : मुलांवर चांगले संस्कार घडविण्याचे काम प्राथमिक शाळांमध्येच होते. त्यामुळे प्राथमिक शाळा टिकल्या पाहिजेत आणि त्यांचे संवर्धन झाले पाहिजे. गावोगावी असलेल्या प्राथमिक शाळांचे अस्तित्व जपले तरच समाजाचे आणि देशाचे भविष्य उज्ज्वल राहील, असे प्रतिपादन जीएसएस कॉलेजचे माजी प्राचार्य आनंद कृष्णा मेणसे यांनी केले.
कंग्राळी खुर्द (ता. जि. बेळगाव) येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेच्या शतकोत्तर महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी आयोजित ‘आजच्या तरुणांची दिशा, दशा व मातृभाषेतून शिक्षणाचे महत्त्व’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते.
मेणसे म्हणाले की, कंग्राळी खुर्द येथील शाळेने केवळ परिसराच्या शैक्षणिक विकासातच नव्हे तर विविध क्षेत्रांत देश-विदेशात नाव कमावणारे विद्यार्थी घडविण्यातही मोठे योगदान दिले आहे. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात गावाने पैलवान मारुती बेन्नाळकर यांच्या रूपाने पहिला हुतात्मा दिला, ही बाब अभिमानास्पद असून सीमा लढ्यात या गावाचे योगदान महत्त्वाचे राहिले आहे. त्यामुळे शंभर वर्षांचा इतिहास असलेली ही शाळा पुढील शंभर वर्षेही टिकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
बेळगावातील अनेक जुन्या मराठी शाळांनी दीडशे वर्षांहून अधिक काळ पूर्ण केला असला तरी त्यांची पटसंख्या घटत चालल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. मात्र कंग्राळी खुर्द शाळेची पटसंख्या तुलनेने समाधानकारक असल्याचे सांगत त्यांनी ग्रामस्थांचे कौतुक केले.

संस्कारक्षम शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करताना मेणसे म्हणाले की, आज आर्थिक समृद्धी वाढत असताना वृद्धाश्रमांची संख्या वाढत आहे. आई-वडिलांचा सन्मान, ज्येष्ठांची सेवा आणि सामाजिक जबाबदारी शिकवणारे शिक्षणच खरे शिक्षण आहे. केवळ पैसा समाज घडवत नाही, तर मूल्याधारित शिक्षण समाजाला दिशा देते.
मराठी शाळांच्या अस्तित्वाबाबत चिंता व्यक्त करताना त्यांनी जातीवादापासून दूर राहण्याचे आवाहन केले. एकेकाळी विविध जाती-धर्मातील विद्यार्थी संयुक्त महाराष्ट्रासाठी एकत्र येत होते, मात्र आज समाजात फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
खाजगी शिक्षण संस्थांच्या वाढत्या जाळ्यामुळे आणि प्राथमिक शिक्षणाच्या होत असलेल्या दुर्लक्षामुळे सर्वसामान्य कुटुंबांवर मोठा परिणाम होत असल्याचे त्यांनी नमूद केले. शिक्षणाचे वाढते खाजगीकरण गरीब आणि ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी धोकादायक ठरणार असून त्याचा सर्वाधिक फटका मुलींच्या शिक्षणाला बसू शकतो, असा इशाराही त्यांनी दिला.
गावातील प्राथमिक शाळांमध्येच मुलांना प्रवेश द्यावा, शाळांच्या कामकाजावर लक्ष ठेवावे आणि आवश्यकतेनुसार प्रशासनाकडे तक्रारी कराव्यात, असे आवाहन करत “वाटेल ते करून आपल्या गावातील प्राथमिक शाळा वाचवा आणि त्यांचे संवर्धन करा. प्राथमिक शाळा टिकल्या तरच आपले भवितव्य उज्ज्वल राहील,” असे मेणसे यांनी शेवटी सांगितले.




