बेळगाव लाईव्ह : मराठी भाषा प्रेरणा मंच, बेळगाव यांच्या वतीने दहावीच्या वार्षिक परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा रविवार, २१ जून २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता विद्यानिकेतन सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
या सोहळ्यात बेळगाव शहर, बेळगाव ग्रामीण आणि खानापूर तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा रोख रक्कम, प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात येणार आहे. समान गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांसह एकूण ४५ विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव होणार आहे.
प्रत्येक विभागातील प्रथम क्रमांकाच्या विद्यार्थ्याला १० हजार रुपये, द्वितीय क्रमांकाला ६ हजार रुपये आणि तृतीय क्रमांकाला ४ हजार रुपये अशी एकूण एक लाख रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत. तसेच गणित किंवा विज्ञान विषयात १०० पैकी १०० गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना निवृत्त कार्यकारी अभियंता शशिकांत नाईक यांच्या वतीने प्रत्येकी १ हजार रुपयांचे विशेष पारितोषिक दिले जाणार आहे.
यावेळी शंभर टक्के निकाल लागलेल्या मराठी माध्यमाच्या शाळांच्या मुख्याध्यापकांचा सत्कार करण्यात येणार असून, एका उत्कृष्ट शाळेला ‘महात्मा फुले आदर्श शाळा’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
यंदा कार्यक्रमाची व्याप्ती वाढविण्यात आली असून विद्यार्थी व पालकांसाठी विशेष मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले आहे. ‘मी यश कसे साध्य केले?’ या संवाद सत्रात गुणवंत विद्यार्थी आपले अनुभव मांडणार आहेत. तसेच मुंबई आयआयटीचे प्रा. डॉ. गोपाळ पाटील हे ‘दहावीनंतरच्या पाऊलवाटा’ या विषयावर विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करणार आहेत.
या मार्गदर्शनाचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मराठी भाषा प्रेरणा मंचतर्फे करण्यात आले आहे.





