बेळगाव लाईव्ह :वसतीगृहाच्या जेवणात झुरळ, किडे सापडण्याबरोबरच अंघोळीसाठी पाणी नाही, थेट पिल्यास हॉस्पिटलचा रस्ता धरायला लावणारे अशुद्ध पिण्याचे पाणी वगैरे समस्यांमुळे संत्रस्त झालेल्या वस्तीगृहातील विद्यार्थ्यांनी संतप्त होऊन रात्री उशिरा आंदोलन छेडल्याची घटना संगमेश्वरनगर बेळगाव येथे घडली.
बेळगाव शहरातील संगमेश्वरनगर येथील मॅट्रिकनंतरच्या मुलांसाठी असलेल्या विद्यार्थी वसतीगृहात गेल्या अनेक दिवसांपासून पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. साधे स्वच्छ पिण्याचे पाणी देखील या ठिकाणी मिळत नाही. पाणी नसल्यामुळे प्रातःविधी उरकणे मुश्किल होत असल्याने विद्यार्थ्यांची कुचंबना होत असते. वाढलेल्या जेवणामध्ये वारंवार मृत झुरळ सापडतात.
विद्यार्थ्यांच्या समस्यांचे निवारण करण्यासह वसतीगृह देखभालीसाठी नेमण्यात आलेला वॉर्डन कधीतरी एकदा वस्तीगृहाला भेट देऊन गेला की पुन्हा फिरकून पहात नाही, असा संतप्त विद्यार्थ्यांचा आरोप आहे. तथापि काल रात्री वॉर्डनचे वस्तीगृहात आगमन झाले असताना जेवण करणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी एकाच्या अन्नात मृत झुरळ आढळून आले.
त्यामुळे संतप्त होऊन जेवण सोडून उठलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी आपली जेवणाची ताटे वस्तीगृहाबाहेर ठेवून धिक्काराच्या घोषणा देत आंदोलनाला सुरुवात केली. तसेच समाज कल्याण खात्याच्या तालुका अधिकारी आणि संयुक्त संचालकांनी तात्काळ वस्तीगृहाला भेट द्यावी, अशी मागणी लावून धरली.

दरम्यान, एपीएमसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षकांनी वसतीगृहात दाखल होऊन संतप्त विद्यार्थ्यांची समजूत काढून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. तसेच पुन्हा निकृष्ट भोजन पुरवले जाऊ नये यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची वसतीगृहात बैठक घेऊन परिस्थिती सुधारली जाईल, असे आश्वासन पोलीस अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना दिले.
त्यानंतर अन्न विषबाधा होऊन मुलांचे आरोग्य बिघडल्यास उपचाराची त्वरित सोय व्हावी यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून वस्तीगृहाच्या ठिकाणी रुग्णवाहिका मागविण्यात आली. एकंदर संगमेश्वरनगर येथील विद्यार्थी वस्तीगृहात वारंवार विविध समस्या उद्भवत असतात आणि याला प्रामुख्याने वॉर्डनचे दुर्लक्ष कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. तेंव्हा आता समाज कल्याण खाते याबाबतीत कोणती कार्यवाही करणार हे पहावे लागणार आहे.




